वैष्णो देवी यात्रेच्या मार्गावर दरड कोसळली; 2 भाविकांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माता वैष्णोदेवीच्या मंदिराजवळ दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे, या भूस्खलनात दोन महिला यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे तर एक मुलगी जखमी झाले आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीच्या तीन किलोमीटर पुढे असलेल्या पंचीजवळील रस्त्यावर दुपारी 2.35 वाजता भूस्खलन झाले, ज्यामुळे वर बांधलेल्या लोखंडी संरचनेचा एक भाग देखील खराब झाला. अचानक दरड कोसळल्यानंतर त्याठिकाणी प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून अपघातात जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरड कोसळल्यामुळे त्या भागातील रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला आहे. प्रवाशांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरड कशी कोसळली त्या घटनेचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आले आहेत. भूस्खलनाची घटना कशी घडली हे सदर विडिओ मध्ये दिसत आहे.

प्रशासनाने यात्रेकरुंना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. तसेच सर्वत्र लक्ष ठेवून मार्गक्रमण करण्यास सांगितलं आहे. भूस्खलनानंतर यात्रेचा मार्ग बंद आहे. लवकरच मलबा हटवून वाट मोकळी करून दिली जाईल असंही प्रशासनाने सांगितलं आहे श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे सीईओ यांनीही सदर घटनेबद्दल माहिती देताना म्हंटल, श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्रावर दरड कोसळली असून श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अधिक तपशिलांची प्रतीक्षा आहे. यापूर्वी 2022 मध्ये नवीन वर्षाच्या दिवशी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला होता तर 16 जण जखमी झाले होते.