Sunday, June 4, 2023

ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटात घाटीतील निवासी डॉक्टर संपावर

औरंगाबाद – समुपदेशन प्रक्रिया तात्काळ व्हावी व अन्य मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) येथील निवासी डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला. काल पासून त्यांनी संप सुरू केला असून सकाळच्या सत्रात त्यांनी बाह्यरूग्ण विभागासमोर निषेध व्यक्त केला. राज्यभर आंदोलनाचे वारे वाहत असून मुंबईतील ‘मार्ड’ या संघटनेच्या निवासी डॉक्टरांनी गुरूवारी संप सुरू केला. या संपात औरंगाबादच्या घाटी रूग्णालयातील डॉक्टर शनिवारी सहभागी झाले. तत्पूर्वी संपाबाबतचे निवेदन त्यांनी शुक्रवारी वैद्यकीय अधिष्ठातांना दिले होते.

अत्यावश्‍यक सेवा व कोविड सेवा वगळता निवासी डॉक्टरांनी सकाळी नऊ वाजता काम बंद आंदोलनाला सुरूवात केली. सकाळी अकरा वाजता हे डॉक्टर्स घाटीच्या बाह्यरूग्ण विभागासमोर आले व त्यांनी शासन, प्रशासनाकडून काऊन्सलिंग प्रक्रीयेला होत असलेल्या विलंबाबाबत निषेध व्यक्त केला. निवासी डॉक्टरांच्या प्रामुख्याने दोन मागण्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे प्रथम वर्षासाठी निवासी डॉक्टर्स (जेआर – वन) यांचे अजून प्रवेशप्रक्रिया झाली नाही. याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे या प्रक्रियेला किती वेळ लागेल हे निश्‍चित सांगता येत नसल्याचे निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेचे स्थानिक अध्यक्ष डॉ. अक्षय क्षीरसागर म्हणाले. न्यायलयाचा निर्णय आला व काऊन्सलिंग प्रक्रिया सूरू झाली तरीही त्यासाठी अजून दोन ते तीन महिने लागतील.

कोविडची तिसरी लाट बघता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयांत डॉक्टरांची संख्या तोकडी पडू शकते. या सर्व कोविड रूग्णांचा भार निवासी डॉक्टरांवर पडेल. कमी डॉक्टरांमुळे नॉन कोविडशिवाय कोविडचाही भार सहन होणार नाही असे निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्वरीत काऊन्सलिंग प्रक्रिया पार पाडून निवासी डॉक्टरांची पहिल्या वर्षातील प्रवेशप्रक्रिया त्वरीत व्हावी. नॅशनल व स्टेट काऊन्सलिंगमध्ये नाव नोंदणी, शुल्क आकारणी, कागदपत्रे पडताळणी यात पंधरा ते वीस दिवस जातात. ही प्रक्रिया राज्य पातळीवर करता येईल ती शासनाने तात्काळ करावी ही सुद्धा महत्वाची मागणी आहे.