कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात वाळू उपसावर बंदी असल्याने अनेकजण प्रशासन कधी वाळू उपसाचा निर्णय घेणार याकडे नजरा लावून बसलेले आहेत. मात्र कराड शहरालगत वारंवारं नागरिक वाळूचोरीची तक्रारी करत असूनही दिवसाढवळ्या होणारी वाळूचोरी प्रशासनाला दिसत नाही. त्यामुळे वाळूचोर जोमात आणि प्रशासन कोमात असे चित्र पहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या वाळूचोरी करणारे वाळूचोर आणि महसूल विभागाचे साटेलोटे असल्याने प्रशासन झोपेंचे सोंग घेत आहे का असा सवाल निर्माण केला जात असून जिल्हाधिकारी याप्रकरणात लक्ष घालणार का ?
कराड शहरातून कृष्णा- कोयनेचा संगम होत असून या दोन नदीच्या काठी असणाऱ्या वाळूवर चोर गेल्या अनेक दिवसांपासून डल्ला मारत आहेत. परिसरातील प्रितिसंगम घाट, गोवारे, सैदापूर, येरवळे याठिकाणी वाळूचोर अनेकदा रात्रीची वाळू चोरी करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवारं बैठकित अधिकाऱ्यांना सांगितल्या आहेत. वाळूचोर यांच्यावर मोठी कारवाई होत नसल्याने दिवसेंनदिवस या प्रकारात वाढ होत चाललेली आहे. वाळूचोरी दिवसा होत असतानाही या ठिकाणावरील तलाठी, मंडलधिकारी अनभिज्ञ असल्याने आश्चर्यव्यक्त केले जात आहे.
काही दिवसापूर्वी प्रितीसंगम घाटावरील वाळू गाढवांचा वापर करून चोरली जात होती, त्यानंतर रात्रीची वाहनांतून चोरत होते. आता रात्री वाळू पोत्यांत भरून ठेवली जात असून दिवसा टेम्पोतून वाहून नेली जात आहे. तरीही कोणत्याच प्रशासनाच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांला माहीती मिळत नाही. तसेच नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यामध्ये पोहायला जाणाऱ्या लोकांचा जीवही गमावू शकतो, तेव्हा हा सर्व प्रकार केव्हा थांबणार, तसेच आजपर्यंत वाळूचोरी होत असताना नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर कारवाई होत आहे. तेव्हा नेहमीच नागरिकांनी पुढाकार घेवून तक्रार करायची तर मग प्रशासन केव्हा जागे होवून अवैध वाहतूक थांबवणार असा सवाल निर्माण होतो.
सैदापूरमधून छोटा हत्तीतून वाळूचोरी
शहरालगत असणारे सैदापूर या गावातून नदीकाठची वाळू चोरी केली जात आहे. कराड शहराच्या प्रितीसंगम घाटावरून दररोज सुरू असलेली वाळूचोरी नागरिक पाहत असतात. मात्र तरीही वाळूचोर बिनधास्त आपले काम करत असतात. त्यामुळे कायद्याला किंवा नागरिकांना न जुमानता वाळूचोरी करणारे यांना नक्की अभय कोणाचे असा सवाल नागरिकांच्यातून केला जात आहे.