पृथ्वीराजबाबांची 700 मीटरची शिवारफेरी, शेतात केली कोळपणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, काँग्रेसचे महासचिव, राज्याचे माजी मुख्यमंत्री यासह अनेक जबाबदाऱ्या उत्कृष्ट आणि कौशल्याने यशस्वी पार केलेल्या कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (शनिवारी) सकाळी मतदारसंघातील वांग खोऱ्यात विकासकामांच्या झंझावती दौऱ्यास सुरुवात केली. त्यांच्या विशेष प्रयत्नातून या खोऱ्यातील वानरवाडी येथील महत्वपूर्ण जुन्या पाझर तलाव दुरुस्तीसाठी निधी प्राप्त झाला आहे. त्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते सकाळी झाले. आ. चव्हाण वानरवाडीमध्ये पोहचल्यानंतर त्यांनी ग्रामदैवत श्री नाईकबा मंदीरात दर्शन घेतले. त्यानंतर महिलांनी औक्षण केल्यानंतर तलावातील कामाच्या शुभारंभ स्थळाकडे त्यांच्याबरोबर शेकडो ग्रामस्थ रवाना झाले.

परंतु गावापासून कार्यक्रमस्थळ सुमारे 700 ते 800 मीटर अंतरावर होते. त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. त्या बाजूस जाण्यास शेताच्या बांधावरून जावे लागत होते. वाटेत शेतांमध्ये खरिपातील भात, भूईमुग व ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे तलावाकडे सर्वांनी पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. सद्यस्थिती ग्रामस्थांनी चर्चा करत असताना सांगितल्यानंतर पृथ्वीराजबाबांनी मागे-पुढे न पाहता तलावाकडे पायी जाण्यास होकार दिला.

आणि त्यांनी चक्क शिवारफेरी सुरु केली. ग्रामस्थांशी चर्चा विनिमय करत ते तलावाकडे चालले असताना वाटेत एका शेतात वयोवृद्ध श्री. शिवाजी ज्ञानू तोडकर भात पिकात कोळपणी करत होते. तेथे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बाबांनी कोळपे हातात घेवुन ते चालवले.

त्यानंतर ते तलाव स्थळावर पोहचल्यानंतर त्यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला. त्यानंतर पुन्हा ते याच मार्गाने गावामध्ये चालत आले. बाबांनी वानरवाडीत ये-जा अशी 1400 मीटरची शिवारफेरी व कोळपणी केल्यानंतर ग्रामस्थांना त्यांच्या साधेपणाचे कौतुक वाटले. यानिमित्ताने आ. चव्हाण यांनी गतवर्षी तलाव पाहणी केली होती. त्यावेळेस पृथ्वीराजबाबांनी दुचाकीवरून प्रवास केला होता. या आठवणीस सर्वांनी उजाळा दिला.

Leave a Comment