लोकसभा निवडणुकीत वंचितचा मोठा पराभव; प्रकाश आंबेडकरांकडून नाराजी व्यक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) राज्यात किती जागा जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु, या लोकसभा निवडणुकीत वंचितला यश मिळालेले नाही. तर खुद्द प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचाही अकोल्यातून पराभव झाला आहे. या पराभवानंतर स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “लोकसभा निवडणुकीत अकोल्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो. मी प्रत्येक VBA कार्यकर्त्याचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि पक्षाप्रती ठोस समर्पण केल्याबद्दल आभार मानू इच्छितो. यासह ज्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचा पराभव केला त्यांचेही मी आभार मानतो.”

त्याचबरोबर, “पक्ष जिंकला नाही म्हणून मी निराश आहे. पण मी आशा सोडलेली नाही. माझे सहकारी आणि मी आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करू आणि त्यांचे विश्लेषण करू आणि आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू. वंचित बहुजन आघाडी विजय असो” असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 35 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यातील 7 ठिकाणी वंचितने इतरांना पाठिंबा दिला होता. यामध्ये, कोल्हापूर, नागपूर आणि बारामती अशा मतदारसंघांचा समावेश होता. मधल्या काळात वंचित आघाडी महाआघाडीसोबत आली नाही तर त्याचा मोठा फटका बसेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु निवडणुकीचा निकाल आल्यानंतर ही शक्यता फोल ठरली आहे.