हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता कमी अंतराच्या इंटरसिटी प्रवासासाठी भारतीय रेल्वे वंदे मेट्रो लाँच (Vande Metro) करण्यासाठी सज्ज झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसपासूनच प्रेरणा घेतलेली हि रेल्वे कमी अंतर असलेल्या शहरांना जोडण्याचे काम करेल. वंदे मेट्रोचा पहिला रॅक चेन्नईस्थित आईसीएफ कोच फॅक्टरी येथे तयार झाला आहे. याच्या लोड चाचणी, वेग चाचणी आणि कंपन चाचणीसाठी हा रेक चेन्नईहून राजस्थानच्या कोटा विभागात पाठवला जात आहे. आज आपण वंदे मेट्रोचे आतील आणि बाहेरील फोटो पाहुयात म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कि हि ट्रेन किती आधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे.
काय फीचर्स मिळतील? Vande Metro
वंदे मेट्रो डेव्हलोप करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हंटल कि, या ट्रेनमुळे लोकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होईल. संपूर्ण ट्रेन वातानुकूलित असल्यामुळे प्रवाशांना त्यात प्रवास करताना थकवा जाणवणार नाही. प्रत्येक कोचमध्ये 100 प्रवासी बसतील आणि अतिरिक्त 200 लोकांसाठी उभे राहण्याची जागा उपलब्ध असेल. वंदे मेट्रो मध्ये वंदे भारत एक्सप्रेस सारखेच स्वयंचलित दरवाजे आहेत.
वंदे मेट्रो ट्रेनमध्ये (Vande Metro) वेगवान असेलेरेशन आणि डिसलेरेशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला असून ताशी 130 किमीच्या वेगाने हि ट्रेन धावेल. या ट्रेनमध्ये पॅनोरॅमिक खिडक्या आणि आधुनिक टॉयलेट बसवण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान जर टॉयलेटचा वापर करावा लागला तर त्यांना तिथला सुखद अनुभवही मिळेल.
पहिल्या वंदे मेट्रोमध्ये 12 डबे बसवण्यात आले आहेत. यात दोन्ही बाजूंना इंजिन कोच आणि सहा ट्रेलर कोचसह सहा मोटर कोच आहेत. एक प्रकारे याला AC MEMU (मेनलाइन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) म्हणता येईल. मात्र, त्यातील सुविधा वंदे भारत एक्स्प्रेससारख्या असतील.
वंदे मेट्रो ट्रेनमध्ये एलसीडी डिस्प्लेसह सुसज्ज पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिमसह हलक्या वजनाचा ॲल्युमिनियम लगेज रॅक मिळत असून कमी अंतर कव्हर करणाऱ्या प्रवाशांना सुखद अनुभव मिळेल. यामध्ये मोबाईल चार्जिंग सॉकेट्स, KAVACH ट्रेन अँटी कोलिजन सिस्टम, डिफ्यूज्ड लाइटिंग, रूट इंडिकेटर डिस्प्ले, रोलर ब्लाइंड्स सारखे फीचर्स मिळतात.
सुरुवातीला वंदे मेट्रो ट्रेन आग्रा-मथुरा, दिल्ली-रेवाडी, लखनौ-कानपूर, तिरुपती-चेन्नई आणि भुवनेश्वर-बालासोर या मार्गांवर धावण्याची शक्यता आहे.