दहिवडी | माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथे ज्वारीला पाणी द्यायला मनाई केल्याच्या रागातून सख्ख्या भावाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. सदाशिव अण्णा वाघमोडे यांनी याबाबतची फिर्याद दिली असून मयताच्या भावासह पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मारूती धुळा वाघमोडे व आबा मारूती वाघमोडे अशी अटक केलेल्या बापलेकांची नावे आहेत. तर अण्णा धुळा वाघमोडे (वय- 75) असे खून झालेल्याचे नाव आहे. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरकुटे मलवडीतील रानात अण्णा वाघमोडे हे त्यांच्या मालकीच्या ज्वारीच्या पिकाला पाणी देण्यास गेले होते. रात्री दोन वाजता लाईट येणार असल्याने शेतातच झोपण्यासाठी गेले होते. तेथे जाऊन मारुती वाघमोडे व आबा वाघमोडे यांनी अण्णा यांना झोपेतून उठवून शेतातून पाणी नेवून दे, असे विचारले असता अण्णांनी त्याला नकार दिला.
यावेळी रागातून बापलेकांने संगनमताने कुऱ्हाडीने वार करून अण्णा वाघमोडे यांचा खून केला. या घटनेनंतर सपोनि बाजीराव ढेकळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याप्रकरणी संशयित मारूती व आबा वाघमोडे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त केली आहेत.