अमरावती प्रतिनिधी / लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जवळ आली असून, निवडणूकीच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. निवडणूक खर्च निरीक्षक बसंत गढवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री,पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस अधिक्षक दिलीप झळके, विविध उप निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी आवश्यक पोलिंग पार्टी आहे किंवा कसे हे तपासावे. आवश्यक मनुष्यबळाची तजवीज आताच करून घ्यावी. प्रतिबंधात्मक कार्यवाहीत नियमितता ठेवावी. पोस्टल बॅलेटसाठी केंद्र तयार करावे. मतदानाच्या दिवशी हेल्पडेस्क सर्व ठिकाणी असावा. केंद्रावर पुरेशी पेयजलाची व्यवस्था असावी. गृहभेटींचा कार्यक्रम वेळेत पूर्ण करावा. व्होटरस्लीपसोबत आवश्यक माहितीपुस्तिका वितरीत व्हावी.
प्रत्येक ग्रामपंचायतीचा एक कर्मचारी, ग्राम रोजगारसेवक आदींचे मनुष्यबळ मतदान केंद्रावर सहकार्यासाठी वापरण्यात येईल, असे श्रीमती खत्री म्हणाल्या. उद्या शुक्रवारी प्रत्येक मतदान केंद्रावर चुनावी पाठशाला आयोजित करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाचे –
नागरीकांच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष…
आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटूंबियांसमवेत सुजय विखेंनी साजरा केला गुढी पाडवा