पुसेसावळी | खटाव तालुक्यातील चोराडे येथील जागृत देवस्थान श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी श्री भैरवनाथ मंदिर हे पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे मंदिर असुन नवसाला पावणारा म्हणून हे देवस्थान प्रसिध्द आहे, प्रत्येक रविवारी तसेच पौर्णिमेला व नवरात्र उत्सवात याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येत असतात.
सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त दि. 23 एप्रिल ते 27 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. 23 रोजी पहाटे श्री भैरवनाथास दुग्धाभिषेक व पुजा बांधण्यात येणार असून रात्री 7 ते पहाटे 4 वाजेपर्यंत लेझीम, गझी मंडळ, आतिषबाजी, हलगी, सनई पारंपरिक वाद्यांच्या गजरात भैरवनाथाची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
रविवार, दि. 24 एप्रिल रोजी सकाळी 6 ते 1 या वेळेत हजारो भाविकांच्या उपस्थितीत भैरवनाथाची मानाच्या सासनकाठ्यांसह गुलाल खोबऱ्याची उधळण करत भव्य मिरवणुक निघणार आहे. यावेळी भाविकांच्यावतीने नवसाच्या एक रुपयांपासून हजारो रुपयांच्या माळा व नारळाचे तोरण भैरवनाथाच्या चरणी अर्पण केल्या जातात.
सोमवार, दि. 25 एप्रिल रोजी सकाळी व रात्री माया मलकापूरकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. दुपारी 4 वाजता जंगी कुस्ती मैदान होणार आहे. मंगळवार, दि. 26 रोजी श्री संतोषीमातेची भव्य मिरवणूक व महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बुधवार, दि. 27 एप्रिल रोजी बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील सर्व भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमेटी अध्यक्ष/सचिव सचिन शहाजी पिसाळ व सदस्याच्या वतीने करण्यात आले आहे.