हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाकेबाज नेते अशी ओळख असणाऱ्या वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. नुकतीच त्यांनी एक पोस्ट लिहीत पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे. आपल्या या पोस्टमध्ये त्यांनी साहेब मला माफ करा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अखेरची साद घातली आहे. त्यामुळे आता मनसेतून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे कोणता निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वसंत मोरेंनी काय म्हणले आहे?
पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो.
परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिका-यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचे तंत्र अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.