हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मनसेतून वंचित बहुजन आघाडीत गेलेल्या वसंत मोरे यांनी आज (मंगळवारी) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. यावेळी संजय राऊतसह नगरसेवक, शाखाध्यक्ष, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि इतर मंडळी उपस्थित होत्या. महत्वाचे म्हणजे, वसंत मोरे (Vasant More) यांनी वंचितची साथ सोडल्यामुळे प्रकाश आंबेडकरांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात मनसे पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचा मोठा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा वसंत मोरे यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. आता त्याने उद्धव ठाकरे यांच्या घरात प्रवेश करत शिवबंधन हाती बांधले आहे. त्यामुळे वसंत मोरे यांना उद्धव ठाकरे गटाकडून मोठी जबाबदारी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वसंत मोरे यांची प्रतिक्रिया
दरम्यान, ”16व्या वर्षी मी शिवसैनिक झालो होतो. बारावी पास झाल्यावर मी शाखाप्रमुख झालो. माझा राजकीय प्रवास शिवसेनेतूनच सुरू झाला. आता माझा शिवसेनेत प्रवेश झाला नाही तर, मी घरी परत आलो आहे. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश करत आहे. त्यामुळे पक्ष जी जबाबदारी मला देईल ती स्वीकारून प्रामाणिकपणे काम करेन” अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत दिली आहे.