हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे डॅशिंग नेते आणि नुकतीच वंचित बहूजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवलेले वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. येत्या ९ जुलै रोजी वसंत मोरे यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार असून याबाबत त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण ९ जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितलं.
वसंत मोरे म्हणाले, आज मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत सर्व प्राथमिक चर्चा पार पडल्या आहेत. ९ जुलै रोजी माझा ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. मी वंचितमध्ये गेलो होतो मात्र मतदारांनी मला स्विकारलं नाही. मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होत आहे. शिवसेनेकडून महानगरपालिकेत कडवे आव्हान देऊ, असेही वसंत मोरे यांनी म्हंटल. विधानसभा निवडणूक लढवणार का? असा सवाल केला असता पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय होईल असं म्हणत वसंत मोरे यांनी अधिक बोलणं टाळलं. मात्र वसंत मोरे खडकवासला किंवा हडपसर मधून विधानसभा लढवू शकतात असं बोललं जातंय.
दरम्यान, पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे यांनी संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र पुण्यातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचे तिकीट फायनल झाल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा लढवली. मात्र लोकसभेत त्यांचा दारुण पराभव झाला होता. आता ते उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. वसंत मोरेंच्या पक्ष प्रवेशामुळे पुण्यात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.