वसंतदादा पाटील बँकेच्या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

गेल्या काही वर्षांपासून ठप्प असलेल्या अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटींच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. चाैकशी अधिकारी ॲड. आर. डी. रैनाक यांनी तातडीने दोन सुनावण्या घेऊन महिन्याअखेरीस उलट तपास होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे घोटाळ्यातील माजी संचालक, अधिकारी यांची चिंता वाढली आहे.

वसंतदादा बँकेतील घोटाळाप्रकरणी सहकार विभागाकडील एका अपिलवर सुनावणीवेळी २०१८ मध्ये स्थगिती दिली गेली होती. त्यानंतर त्यावर सुनावणी प्रलंबित असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून चौकशी थांबली होती. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करताना सहकारमंत्र्यांसमोर हे अपिल फेटाळण्यात आल्याने बँकेच्या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. महिन्याअखेरीस उलट तपासणी होण्याची चिन्हे आहेत.

अवसायानातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी २७ माजी संचालक, तीन मृत संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर संबंधितांच्या मालमत्ता जप्तीचे आदेशही त्यांनी काढले होते. अंतिम टप्प्यात ही प्रक्रिया आल्यानंतर तत्कालिन सहकारमंत्र्यांनी एका अपिलावर स्थगिती दिली व प्रदीर्घ काळ चौकशी ठप्प होती.

Leave a Comment