Vasu Baras : दिन दिन दिवाळी गाईम्हशी ओवाळी; दिवाळी पाडवा म्हणजे नक्की काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#HappyDiwali : हिंदूंचा एक प्रसिद्ध सण. (Vasu Baras) आश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो. हा आता केवळ हिंदूंचा सण मात्र राहिला नाही. त्याचा मूळ उद्देश हा अंधारावर प्रकाशाची मात असा आहे. त्यामुळे सर्वच धर्मियांनी कमी अधिक प्रमाणात दिवाळीचा स्विकार केला आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सर्वच यात सामिल होतात.

पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होत असल्यामुळे या उत्सवाला धार्मिक व सामाजिक महत्त्व आले आहे. यावेळी नवे धान्य
तयार झालेले असते, म्हणून हा कृषिविषयक आंनदोत्सवही आहे. दिवाळीच्या पाचही दिवसांचे माहात्म्य सांगणाऱ्‍या
अनेक कथा पुराणांत आलेल्या आहेत. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गोवत्सद्वादशी असते. यास वसुबारस (Vasu Baras) असेही म्हणतात. या दिवशी सुवासिनी सवत्स गाईची पूजा करतात. हा दिवसही दिवाळीचाच एक दिवस मानतात. आश्विन वद्य
त्रयोदशीला धनत्रयोदशी हे नाव आहे. यमराजाने आपल्या दूतांना ‘या दिवशी जो दीपदान करील, त्याला अपमृत्यू येणार
नाही’, असे सांगितल्याची कथा आहे. म्हणून या दिवशी मंगलस्नान करून दीप लावतात. यमराजासाठी दक्षिणेकडे तोंड
करून याच दिवशी दिवा लावायचा असतो. इतर वेळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावणे अशुभ समजतात.

Diwali

आश्विन वद्य चतुर्दशीस नकरचतुर्दशी हे नाव आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला व त्याच्या बंदिवासात
असलेल्या सोळा हजार स्त्रियांना बंधमुक्त केले. नरकासुराच्या रक्ताचा टिळा लावून कृष्ण सूर्योदयापूर्वी परत आला. त्या
वेळी त्यास मंगलस्नान घालून ओवाळण्यात आले. याची स्मृती म्हणून सूर्योदयापूर्वी स्नान करून दिवे लावतात व
आनंदोत्सव साजरा करतात. सत्यभामेने श्रीकृष्णाच्या साहाय्याने नरकासुराला मारले अशीही एक कथा आहे.
आश्विन वद्य आमावस्येच्या रात्री लक्ष्मीपूजन असते. या निमित्ताने अष्टदल कमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा
करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतीक आहे. संयमपूर्वक धन संपादन केले, तर मनुष्याचे कल्याण होते.

यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा करायची असते. या रात्रीची केवळ द्यूत खेळावे, असे सांगितले आहे. द्रव्य हे चंचल
आहे, हे लक्षात येण्यासाठीच या खेळाची योजना असावी. लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता,
मांगल्य, प्रकाश आढळेल, तेथे ती निवास करते अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्याची रोषणाई करतात. घरातील
कचरा घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणारी केरसुणी हिला लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची चाल काही ठिकाणी आहे.
या दिवशी महावीरांचे निर्वाण झाले. म्हणून जैन लोक या दिवशी सर्वत्र दिवे लावून हा दिवस पाळतात. महावीरांचा
प्रकाश सर्वत्र पसरावा हा उद्देश त्यामागे असावा. (vasu Baras)

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हे नाव आहे. या दिवशी विष्णूने वामनावतार घेऊन बळिराजाला पाताळात लोटले.
या दिवशी दीपदान करील त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत, असा वामनाने बळीला वर दिला. या दिवशी
बलिपूजा करण्याचीही पद्धत आहे. या दिवसापासून विक्रम संवत सुरू होतो. म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात.
हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे. गोवर्धनपूजा
करण्याचीही प्रथा काही ठिकाणी आढळते. हा दिवाळीचा मुख्य दिवस मानतात.

cow

कार्तीक शुद्ध द्वितीयेचे भाऊबीज हे नाव आहे. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला तेव्हा तिने त्याला ओवाळले आणि
आनंद व्यक्त केला. तेव्हापासून बहिणीने भावाला ओवाळण्याची चाल रूढ झाली.

भारताच्या निरनिराळ्या भागांत दिवाळीसंबंधी भिन्नभिन्न लोकाचार दिसून येतात. वर्षात ओळीने पाच दिवस येणारा
हा दीपोत्सव असतो. दिवाळीचा सण विशेष महत्त्वाचा असल्यामुळे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीत
घरांवर आकाशदिवे लावतात. त्यामुळे शिव, विष्णू, यम इ. देव संतुष्ट होऊन संपत्ती देतात, असे पुराणांत सांगितले आहे.
निरनिराळी मिष्टान्ने व फराळाचे पदार्थ करून त्यांचा देवांना नैवेद्य दाखवितात व आप्तजन आणि इष्टमित्र यांना
फराळासाठी बोलावितात. फटाके, बाण, भुइनळे इ. उडवून सर्वजण या उत्सवाचा आनंद लुटतात.

भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरु होते ती वसु-बारस या दिवसापासून.
गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला

जातो. हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा
करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे एक
देवता आहे, अष्टवसू म्हणून ती प्रसिद्ध आहे. त्याचा दुसरा अर्थ द्रव्य (धन) असाही होतो. वसू म्हणजे नांगराचा फाळ
तसेच गाईच्या वासरालाही वसू म्हणतात. त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स
द्वादशी असेही म्हणतात. (Vasu Baras)

या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची
सुरुवात होते. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील
सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात
घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या
दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. आपल्या मुला-
बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

प्रतीक पुरी
(माहिती संदर्भ – विकासपिडीया, मराठी विश्वकोश)