व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वेण्णालेक ओव्हरफ्लो : सातारा जिल्ह्याला 12 जुलैपर्यंत रेड अलर्ट

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर पाचगणी, जावळी, पाटण या पूर्वेकडील भागात रात्रीपासून पावसाने सपाटा लावला आहे. महाबळेश्वरला पाणीपुरवठा करणारा वेण्णा तलाव ओव्हरफ्लो झाला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे महाबळेश्वरकर वासीयांच्या पिण्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासह पुणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना 12 जुलै पर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

गेल्या तीन ते चार दिवसापासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. भात पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यामध्ये देखील वाढ होत आहे. पावसाच्या संततधारामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाणही वाढले आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसापासून सुरू असलेला पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी डोंगरदऱ्यात पावसाची रिघ सुरूच आहे. शुक्रवारी दिवसभर सातारा शहरासह पूर्व भागात पावसाने उघडीप दिली होती. मात्र रात्रीपासून पावसाची पुन्हा भुरभुर सुरू झाली आहे.

सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर आणि जावळी या तालुक्यांसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पेरणीसह भात लागण्याच्या कामांना वेग आला आहे. सध्या पडत असलेला पाऊस हा शेतीसाठी पूरक असल्याने भात लागणीसह खरिपातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यात पूर्व भागात मात्र अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने हा भाग कोरडाच आहे. पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्याने कोयना, उरमोडी, कण्हेर, धोम-बलकवडी, धोम, मोरणा, गुरेघर, तारळी या धरणांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे.