हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जगभरात असंख्य रहस्यमय गुहा आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की, रशियाजवळील (Russia) अबखाझिया प्रदेशातील व्हेरोव्हकिना गुहा (Verovkina Cave) ही सर्वात खोल गुहा मानली जाते. या गुहेची खोली तब्बल 2,212 मीटर म्हणजेच 2.2 किलोमीटर आहे. या खोलीचा अंदाज यावरून येतो की, यात 30 कुतुबमिनार सहज मावू शकतात. या गुहेकडे पाहताना देखील अनेकांना भीती वाटते. काही लोक तर या गुन्हेला पाताळलोकाचा प्रवेशद्वार मानतात. आज आपण याच गुहेविषयी जाणून घेणार आहोत.
गुहेचा शोध आणि संशोधनाचा प्रवास
सांगितले जाते की, व्हेरोव्हकिना गुहेचा शोध 1968 मध्ये लागला. त्यावेळी, क्रास्नोयार्स्क शहरातील काही स्पेलिओलॉजिस्ट यांनी ही गुहा पाहिली आणि तिची खोली केवळ 115 मीटर असल्याचे नोंदवले. मात्र, पुढील काही दशकांत संशोधकांच्या मोहिमा सुरूच राहिल्या. 1986 मध्ये, मॉस्कोतील संशोधकांच्या एका मोहिमेत या गुहेची खोली 440 मीटर असल्याचे आढळले.
गुहेच्या वास्तविक खोलीचा शोध लागण्यासाठी अनेक वर्षे संशोधन सुरू होते. अखेर, 2015 पासून पेरोवो-स्पेलियो ग्रुपच्या संशोधकांनी येथे विविध मोहिमा राबवल्या आणि 2018 मध्ये या गुहेची 2,212 मीटर खोली मोजण्यात आली, ज्यामुळे ती जगातील सर्वात खोल गुहा ठरली.
पृथ्वीच्या अंतर्भागाकडे जाणारा मार्ग
खास म्हणजे, या गुहेत तब्बल 6,000 मीटर लांबीचा भूमिगत बोगदा सापडला आहे. काही वैज्ञानिकांचे मत आहे की, ही गुहा पृथ्वीच्या अंतर्भागाकडे नेणारा मार्ग असू शकतो. सुप्रसिद्ध फ्रेंच लेखक ज्युल्स व्हर्न यांच्या “जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ” या कादंबरीत अशाच एका काल्पनिक गुहेचे वर्णन आहे. मात्र, व्हेरोव्हकिना गुहा ही त्या काल्पनिक संकल्पनेचे जणू वास्तव रूप आहे.
दरम्यान, आजही काही वैज्ञानिक या गुहेत विविध शोध मोहिमा राबवत आहेत. या गुहेतील हवामान, वातावरण, तापमान आणि भूगर्भशास्त्रीय स्थिती यांचा अभ्यास केला जात आहे. भविष्यात या गुहेच्या माध्यमातून पृथ्वीच्या अंतरंगातील अद्याप न उलगडलेली रहस्ये उजेडात येऊ शकतात, असे म्हणले जात आहे. खरे तर, ही गुहा केवळ एक नैसर्गिक चमत्कार नसून मानवाच्या जिज्ञासेचे आणि धाडसी संशोधनाचा नमुना आहे.