ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे निधन

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते वसंतराव हुदलीकर यांचे आज पहाटे निधन झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो मुलांचे भवितव्य घडविण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. वसंतराव हुदलीकर यांच्यामुळे सीबीएस जवळील हुतात्मा स्मारक हे पुरोगामी चळवळीचे केंद्र बनले होते. वसंतराव हे अखेर पर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होते. तसेच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत देखील भाग घेतला होता.

छगन भुजबळ यांनी वाहिली श्रध्दांजली
”ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर यांचे आज वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. अत्यंत दुःख झाले. मुळचे समाजवादी पक्षाचे असलेले वसंतराव हुदलीकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी अनेक देशातील अनेक महत्त्वाच्या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोरील हुतात्मा स्मारकाचे ते सर्वेसर्वा होते. याठिकाणी खेड्या पाड्यातील विशेषतः आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुरुकुलासारखे सांभाळत होते. तसेच शहीद कुटुंबातील सदस्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा त्यांचा पुढाकार होता.

महात्मा गांधीच्या विचारांची जोपासना करत आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजसेवेसाठी वाहून घेतले. त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ समाजसेवकाला नाशिककर कायमचे मुकले आहे. त्यांच्या निधनाने हुदलीकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय हुदलीकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.” अशा प्रकारे छगन भुजबळ यांनी वसंतराव हुदलीकर यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

You might also like