देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी आज मतदान होणार आहे. NDA कडून जगदीप धनखड तर विरोधकांकडून मार्गारेट अल्वा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आकडेवारीचा विचार करता NDA च्या जगदीप धनखड यांचे पारडे जड दिसत आहे. लेक्टोरल कॉलेजच्या आकडेवारीनुसार, धनखड यांच्या बाजूनं दोन तृतीयांश मतं आहेत.
लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांसह नामनिर्देशित सदस्य या निवडीसाठी मतदान करण्यास पात्र असतात. संसदेचे सध्याचे संख्याबळ 788 असून, जिंकण्यासाठी 390 पेक्षा जास्त मतांची आवश्यकता आहे.संसद भवनात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार असून संध्याकाळी उशिरापर्यंत देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
धनखड यांना संयुक्त जनता दल, वायएसआर काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, अण्णा द्रमुक पक्षांचा पाठिंबा आहे. यासर्व पक्षाच्या मतदानाचा आकडा पाहता जगदीप धनखड यांना जवळपास 515 मते मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अल्वा यांना आतापर्यंत मिळालेला पक्षांचा पाठिंबा लक्षात घेता त्यांना जवळपास 200 मतं मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.