75 वर्षानंतरही उंडाळकरच : इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुव्वा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या उंडाळे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने एकहाती मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. राष्ट्रवादीचे ॲड. राजाभाऊ पाटील, जयसिंगराव पाटील यांच्या पॅनेलचा 13-0 असा धुव्वा उडाला. उंडाळे सोसायटीची 75 वर्षात पहिल्यांदाच निवडणूक झाली त्यामध्ये काॅंग्रेसच्या उंडाळकर गटाने बाजी मारली.

माजी सहकारमंत्री कै. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनानंतर त्याच्या उंडाळे गावातील सोसायटीची निवडणूक झाली. आजपर्यंत बिनविरोधची परंपरा असलेल्या या सोसायटीत उंडाळकर घराण्यातील दोन पॅनेलमध्ये लढत झाली. विरोधी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या राजाभाऊ पाटील यांच्या पॅनेलचा सर्वच्या सर्व जागावर 200 ते 250 मतांच्या फरकाने पराभव झाला. तर काॅंग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील, ॲड. विजयसिंह पाटील, अजित दिनकर पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनेलने अपेक्षेप्रमाणे मोठा विजय झाला.

सोसायटीच्या निवडणुकीत अधिकराव पाटील, अरुण पाटील, उदयसिंह पाटील, पंडित पाटील, प्रकाश पाटील, सतीश पाटील, संभाजी पाटील, भीमराव शेवाळे, आक्काताई पाटील, कमल पाटील, शामराव लोखंडे, दीपक अंबवडे, रामचंद्र आडके हे उमेदवार विजयी झाली. निकालानंतर उदयसिंह पाटील समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत गावातून मिरवणूक काढली.