10 तारखेला विदर्भ होणार कूल…हवामान विभागाने दिले संकेत

Agriculture
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : यंदा मार्च महिन्यातच उन्हाचा पारा 40 अंश पर्यंत गेला आहे. नागरिक मात्र उन्हाळ्यामुळे हैराण झाले आहेत. राज्यात विदर्भात काही भागात उष्णतेची लाट आली आहे. छत्तीसगडच्या दक्षिण भाग व परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. त्यामुळे विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा जिल्ह्यात शनिवारी विजांच्या कडकडाटात व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

उन्हाळ्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत विदर्भात उन्हाचा पारा 43 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिला आहे येत्या चार ते पाच दिवसात वातावरणात आणखी बदल होऊन उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊन कमाल तापमानाचा पारा अजून काहीसा वाढेल. विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट काही प्रमाणात राहणार असल्याने पुन्हा अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याचे संकेत आहेत.

सोमवारी अकोल्यात उच्चांकी 42.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद

सोमवारी सकाळी 24 तासात अकोला येथे उच्चांकी 42.1 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ होत आहे महाबळेश्वर इथं 17 अंश सेल्सिअसचे सर्वात कमी किमान तापमान नोंदवले गेले.

अंदमान समुद्राच्या उत्तर भाग आणि म्यानमारच्या किनारपट्टी दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर आहे. उत्तर कर्नाटक ते तमिळनाडूच्या उत्तर दक्षिण दरम्यान कमी दाबाचा पट्टा असून तेलंगणा ते उत्तर तमिळनाडू या दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असल्याने उन्हाचा चटका, वाढता उकाडा उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस असे वातावरण बदल होत आहेत.

यामुळे विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात व कोकण गोव्याच्या तुरळक भागात किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.