संग्राम विधान परिषदेचा: शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे निवडणूक रिंगणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक घेण्याची परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे. शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. या निवडणूकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख आणि पूर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्याकडून अद्याप उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाही.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीची गणितं बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा जिंकणाऱ्या भाजपला आता विधानपरिषद निवडणुकीत तुलनेनं कमी जागांवर संधी मिळणार आहे. विधानसभेचं पक्षीय बलाबल पाहता शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसला एक जागा सुटू शकते. तर, भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळे महाविकासआघाडीला ५ आणि भाजपला ४ जागा मिळणार असून 21 मे रोजी पार पडणारी विधानसभेची निवडणूक बिनविरोधच पार पडणार अशी चिन्ह दिसून येत आहेत.

भाजपमध्ये मात्र विधान परिषदेसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यापैकी भाजपचे अरुण अडसड, स्मिता वाघ आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या जागा रिक्त होणार आहेत. तसेच चौथ्या जागेसाठी भाजप मित्रपक्ष आणि अपक्षांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपच्या ४ जागांसाठी विधानसभेत पराभूत झालेले किंवा उमेदवारी न मिळालेल्या ‘स्वकीय आणि परकीय’ अशा दोन्ही इच्छुकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. दरम्यान, भाजपच्या पद्धतीनुसार संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय संसदीय समितीकडे पाठवण्यात आली आहे. या जागांसाठी अनेक नावांची शिफारस राज्याच्या कोअर कमिटीकडून करण्यात आली आहे. याबाबत शिक्कामोर्तब केंद्रीय नेतृत्वाकडूनच केला जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment