व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच? काँग्रेसनं उतरवला पहिला उमेदवार मैदानात, २ जागांसाठी आग्रही

मुंबई । विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस दुसरा उमेदवार लवकरच जाहीर करेल, असं प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. काँग्रेस २ जागांवर ठाम असल्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणार नाहीत, असंच चित्र सध्या दिसत आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने ४ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर शिवसेना २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जणांना उमेदवारी देणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी २-२ जणांना उमेदवारी दिली तर काँग्रेस एकच उमेदवार उतरवेल, अशी चर्चा होती, पण काँग्रेस २ उमेदवारांसाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीनं पाचचं उमेदवार दिले तर निवडणूक बिनविरोध होईल, ६ उमेदवार दिल्यास मात्र मतदानाची वेळ येणार आहे. काँग्रेस दुसऱ्या जागेसाठीही आग्रही आहे. त्यासाठी वाटाघाटीही चालू आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या चारही उमेदवारांनी फॉर्म भरला. भाजपने प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं निश्चित केली आहेत. शिवसेनेने ही दोन्ही नावं निश्चित केली असली, तरी त्यांची अधिकृत घोषणा मात्र अजून झालेली नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देणार असल्याचा चर्चा आहेत. विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. ११ मे हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, तर १४ मेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. ९ पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर मात्र विधानपरिषद निवडणुका होणार, हे अटळ आहे.

दिग्गजांऐवजी काँग्रेसनं दिली एका युवा नेत्याला उमेदवारी
विधान परिषदेसाठी काँग्रेसमध्ये नसीम खान, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा होती. मात्र काँग्रेस हायकमांडनं अखेर जालन्याचे युवा नेते राजेश राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेसकडून अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती, मात्र पक्षानं त्याऐवजी एका युवा नेत्याला संधी दिली आहे. राजेश राठोड हे जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. एनएसयूआयपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव म्हणूनही ते संघटनेत काम करत आहेत.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”