हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक आज पार पडणार आहे. मागील काही दिवसांपासून या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे कारण एकूण ११ जागांसाठी यावेळी १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे नेमका कोणाचा बळी जाणार? आणि कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. विधान परिषद निवडणुकीचे मतदान हे गुप्त पद्धतीने होणार असल्याने फोडाफोडीचे राजकारण बघायला मिळू शकते. त्यामुळे या निवडणुकीत पराभूत होणारा १२ वा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता लागली आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. तर शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने याना संधी देण्यात आली आहे तर अजित दादा गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीबाबत सांगायचं झाल्यास, काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सातव, शेकापचे जयंत पाटील आणि ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना संधी देण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा असेल. त्यामुळे महाविकास आघाडीला आणखी ४ ते ५ जागांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गटाने आपापल्या आमदारांना विविध हॉटेलमध्ये ठेवले आहे. या सर्व आमदारांना मतदान कसं करायचं, कोणत्या पद्धतीने करायचे याबद्दलच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोणाची ताकद किती?
महाविकास आघाडीबाबत सांगायचं झालयास, राष्ट्रवादी शरद पवार – 12, उद्धव ठाकरे शिवसेना – 15 + 1 शंकरराव गडाख म्हणजेच 16 आणि काँग्रेस – 37 अशी एकूण 65 मते आहेत. महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करण्यासाठी चार किंवा त्यापेक्षा अधिक मतांची गरज पडेल. छोट्या पक्षांमधील बहुजन विकास आघाडी – 3, समाजवादी पक्ष – 2, एमआयएम – 2 , मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी – 1, शेतकरी कामगार पक्ष – 1 हे पक्ष महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ शकतात.
महायुतीबाबत सांगायचं झाल्यास, राष्ट्रवादी (अजित पवार) 41, भाजपा – 103 आणि शिवसेना – 38 आमदार महायुतीकडे आहेत. त्यानंतर देवेंद्र भुयार आणि संजयमामा शिंदे यांचा दादा गटाला पाठिंबा आहे. तर रवी राणा , महेश बालदी, विनोद अग्रवाल, प्रकाश आवाडे, राजेंद्र राऊत, विनय कोरे आणि रत्नाकर गुट्टे यांचा भाजपला पाठिंबा आहे. तर शिंदे गटाला सुद्धा 10 आमदारांचा पाठिंबा असून यामध्ये नरेंद्र भोंडेकर , किशोर जोरगेवार , लता सोनवणे , बच्चू कडू , राजकुमार पटेल, आशीष जैसवाल , गीता जैन, मंजुळा गावीत, चंद्रकांत निंबा पाटील आणि राजू पाटील यांचा समावेश आहे. म्हणजेच महायुतीकडे एकूण 201 आमदारांची ताकद आहे.