उद्धव ठाकरेंवरचं संकट टळलं; निवडणूक आयोगाची विधान परिषद निवडणुकीला परवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच आता संपुष्टात येत असून राज्यात विधान परिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना आयोगाने कोरोनाबाबत काळजी घेण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाने २७ मे च्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाची शुक्रवारी बैठक पार पडली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २१ दिवसांनी विधानपरिषद निवडणूक पार पडणार असल्याचं निश्चित झालं आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या पक्षांनी विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या ९ जागांसाठी निवडणुका घेण्याबाबत आयोगाला विनंती करणारे पत्र पाठवले होते.  मुख्य सचिव अजोय मेहता यांनीही तशी विनंती केली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निवडणुका घेण्याबाबतची विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. शिवसेनेचे गटनेते आणि मंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ही पत्रे राज्यपालांपर्यंत पोहोचवली. राज्यपाल कोश्यारी यांनीही निवडणूक आयोगाला या विधानपरिषद निवडणूक घेणे किती आवश्यक आहे हे सांगितले होते. त्यानंतर आज सकाळी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यावर ही निवडणूक बिनविरोध होण्याबाबतचा प्रस्ताव आल्यास भारतीय जनता पक्षाची भूमिका सहकार्याची राहील, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनंतर या घडामोडी घडल्या असून त्यामुळे राज्यपालांशी संघर्षांऐवजी आपसातील संवादाने तोडगा निघाला आहे. निवडणूक आयोग लवकरच विधान परिषदेची निवडणूक जाहीर करेल असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

Leave a Comment