लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही पवारांची तुतारी दणक्यात वाजणार??

sharad pawar vidhan sabha 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. विधानसभेला अवघे ३ महिने शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळणार असला तरी चर्चेच्या केंद्रस्थानी राहतील ते म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) …. राष्ट्रवादीतील फुटीनंतर हि पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने शरद पवार नेमका काय डाव टाकणार? आपल्या पक्षाला पुन्हा एकदा नवी उभारी कशी देणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य आहे. कोणत्याही क्षणी डाव पलटवण्याची ताकद आणि क्षमता शरद पवारांकडे असल्याने आजही भलेभले त्यांना दचकून असतात… आताही शरद पवार यांच्याकडे म्हणावे तसे आकडे नाहीत.. अजित पवारांच्या बंडानंतर जमतेम १२-१३ आमदार शरद पवारांसोबत आहेत. त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह सुद्धा निवडणूक आयोगाने काढून घेतलं आहे. मात्र तरीही लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा पवारांची तुतारी दणक्यात वाजू शकेल असं बोललं जातंय. पवार पुन्हा आपली पॉवर दाखवू शकतील का? त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेत पुन्हा एकदा मुसंडी मारू शकतो का ? हे जाणून घेऊया…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून हा पक्ष जास्तीत जास्त काळ सत्तेत राहिलाय. शाहू- फुले- आंबेडकरांचा विचार जपणारा आणि शेतकरी कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार हा पक्ष… आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात महत्वाची खाती सांभाळली आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेशी चांगलीच नाळ सुद्धा जोडली हा इतिहास आहे. १९९९ ला पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ जागांवर यश मिळालं. त्यानंतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक ७१ जागा जिंकता आल्या. २००९ च्या विधानसभेला पुन्हा ६२ आमदार राष्ट्रवादीने निवडून आणले. या तिन्ही निवडणुकांनंतर पक्षाने राज्यातील सत्ता आपल्या हातात ठेवली. मात्र २०१४ ला भाजप- शिवसेनेचे सरकार आलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला 41आमदाराना निवडून आणता आलं. २०१९ ला तर पक्षातील अनके बड्या नेत्यांनी साथ सोडूनही फक्त शरद पवारांच्या करिष्म्यावर पक्षाने ५४ आमदार निवडून आणले आणि महाविकास आघाडीचा प्रयोग करून सत्ताही स्थापन केली

परंतु अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि शरद पवारांकडे अवघे १२ आमदार राहिले. शरद पवार आणि त्यांचा पक्ष संपला असे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त सुद्धा व्यक्त केलं. मात्र हार मानतील ते पवार कसले. पक्ष आणि चिन्ह गेलं, निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह शरद पवारांना दिले. तीच तुतारी पवारांनी लोकसभा निवडणुकीत फुंकली आणि त्यांच्या पक्षाने १० पैकी ८ खासदार निवडून आणत विरोधकांना धोबीपछाड दिला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा पक्षाला मोठी अपेक्षा आहे आणि सत्तेत बसण्याची संधीही… शरद पवारांकडे स्वतःची पॉवर आहे, एकनिष्ठ नेत्यांची फळी आहे, युवा नेत्यांची साथ आहे आणि महत्वाची बाब म्हणजे बेरजेचे राजकारण करण्याची खेळी आहे. त्यामुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा एकदा उभारी घेण्याची संधी आहे.

१) पवारांची पॉवर –

शरद पवार हे जनमानसात मिसळणारे, जनतेत जाऊन लोकांचं म्हणणं ऐकून घेणारे नेते मानले जातात. सलग ५० वर्ष शरद पवार राजकारण कोळून प्यायलेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची संपूर्ण जाण, राजकीय वातावरण, लोकांच्या अपेक्षा, जनतेचे प्रश्न या सर्व गोष्टींची पवारांना चांगलीच जाणीव आहे. हीच गोष्ट शरद पवारांना इतर राजकारण्यांपेक्षा मोठं करते. कोणत्याही पक्षाचे ध्येयधोरणे काय आहेत हे त्या पक्षाच्या अध्यक्षांवर अवलंबून असते आणि त्यावर पक्षाचं यश- अपयश ठरते. पवार गटाकडे शरद पवारांसारखा दमदार नेता असल्याने साहजिकच त्यांच्या पक्षाला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे

२) निष्ठावान नेते सोबतीला-

अजित पवारांसोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासारख्या बड्या नेत्यांसह तब्बल ४० आमदार असले तरी शरद पवारांकडे जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या निष्ठावान आमदारांची फळी आहे. शरद पवार आणि त्यांच्या पक्षासाठी काहीही करण्याची तयारी आणि धमक या आमदारांमध्ये आहे. हे नेते सध्याच्या राजकीय परिस्थिती इतर कोणत्या पक्षात जाण्याची अजिबात शक्यता नाही. याशिवाय रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासारखे युवा नेत्यांची साथ शरद पवारांना असल्याने त्याचाही फायदा पक्षाला होण्याची शक्यता आहे.

३) शरद पवारांबद्दल सहानभूती –

कोणी कितीही नाही म्हंटल, तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शरद पवारांबद्दल सहानभूती आहे हे नक्की… लोकसभा निवडुकीच्या निकालाने ते दाखवून सुद्धा दिले. ८४ वर्षाचा हा तरुण योद्धा अजूनही लोकांच्यात जातोय, त्यांचे प्रश्न समजावून घेतोय, ऊन-वारा-पाऊस कशाचीही तमा न बाळगता या वयात संघर्ष करतोय यामुळेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शरद पवार यांच्याविषयीचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न असो, कष्टकर्यांचे प्रश्न असो, कामगारांचे प्रश्न असो वा विद्यार्थ्यांचा प्रश्न असो… शरद पवारांनी प्रत्येक प्रश्न अतिशय हुशारीने हाताळले आहेत. पवार सत्तेत असो वा विरोधात असो, अनेकदा तर सरकारला सुद्धा पवारांशी चर्चा करूनच अनेक विषयांवर तोडगा काढावा लागतो.

४) बेरजेचे राजकारण –

डोक्यात २४ तास राजकारणच घुमत असलेल्या पवारांचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे त्यांचं बेरजेचे राजकरण.. सर्वच राजकीय पक्षात पवारांचे चांगले संबंध असल्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होत असतो. लोकसभा निवडणुकीत तर पवारांना उमेदवार तरी मिळतील का असा सवाल विरोधकांनी केला असता पवारांनी पुन्हा एकदा आपली बार्गेनिंग पॉवर दाखवत गोळाबेरीज केली. निलेश लंके, बजरंग सोनावणे, बाळ्यामामा म्हात्रे, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासारखे उमेदवार आयात केले आणि त्यांना निवडून सुद्धा आणलं. पवारांची हीच बेरीज विरोधकांना ऐन निवडणुकीत घायाळ केलं तर नवल वाटायला नको. बडे नेते सोडून गेले तरी आता युवा नेत्यांची फळी नव्याने उभी करण्याचा पवारांचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणजे अजून महाविकास आघडीचे जागावाटप झालेलं नसतानाही पवारांनी रोहित पाटील, अमित भांगरे यांच्यासारख्या युवा नेत्यांची नावे जाहीर करून टाकलीत.

५) मराठा आरक्षणाच्या मुद्याचा पवारांना फायदा –

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील वर्षभरापासून चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे मराठा आंदोलनाला चांगलीच धार आली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज सत्ताधाऱ्यांवर नाराज असून याचा आपोआप फायदा विरोधकांना होतोय. लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरचा परिणाम दिसून आला आणि याचा फायदा महाविकास आघाडी आणि विशेषत: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना झालेला दिसतो. तेच चित्र विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.