मुंबई | सुरज शेंडगे
अनेक मराठी व हिंदी चित्रपटांत आपल्या हलक्या फुलक्या भूमिकांनी रंग भरणाऱ्या विजय चव्हाण यांच दीर्घ आजाराने निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. श्वास घेण्यात येत असलेल्या अडचणींमुळे त्यांना बुधवारी मुलुंड येथील फॉरटीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
विजय चव्हाण यांनी आजपर्यंत जवळपास ४०० चित्रपटात काम केले असून त्यांची मोरूची मावशी नाटकातील मावशीची भूमिका विशेष गाजली.या नाटकाचे प्रयोग भारताचं नव्हे तर परदेशातही गाजले. नाना मामा, जत्रा, पछाडलेला,अग बाई अरेच्चा,चष्मेबहाद्दर, सांगतो ऐका, माहेरची साडी, मुंबईचा डबेवाला, वन रुम किचन, मोरुची मावशी, सासूच स्वयंवर, श्रीमंत दामोदरपंत ही त्यांनी अभिनय केलेल्या इतर काही चित्रपट व नाटकांची उदाहरणे आहेत. विजय चव्हाण यांनी १९८५ साली वहिनीची माया चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरवात केली.अशी असावी सासू या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. मजेशीर, विनोदी ढंगाच्या प्रसंगी हळव्या करुन सोडणाऱ्या भूमिका ही त्यांची खासियत होती. विजय चव्हाण यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील तारा निखळल्याचे भाव सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत. त्यांच्यावर मुलुंड येथे दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.