”फडणवीस हे स्टेजवरचे नट, राणे आणि विखे-पाटीलच भाजप चालवतात”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात भाजपच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता परभणीतील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विजय गव्हाणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवेश करताच त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे स्टेजवरचे नट आहेत. पण, खरा भाजप पक्ष नारायण राणे आणि राधाकृष्ण विखे पाटील चालवतात,” अशी टीका विजय गव्हाणे यांनी केली.

परभणीत आज त्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गव्हाणे यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, माझी राजकीय मैत्री ही प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंची होती. त्यामुळेच मी भाजपमध्ये गेलो. त्या पक्षात काम केले. पण, गोपीनाथ मुंडेनंतर आता ही भाजप तशी राहिली नाही. आता भाजपमध्ये बहुजन समाजातील लोकांना जागाच नाही, असे विधानही गव्हाणे यांनी केले आहे.

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर गव्हाणे यांनी भाजपमधील नेत्यांची होत असलेली खदखद सांगून टाकली. भाजपमध्ये पंकजा ताईंचे पण हाल सुरू आहेत. त्या पक्षात का आहेत? हे माहिती नाही. त्याबाबत मी त्यांना विनंती करणार आहे. भाजपचे विचारच यामागील सूत्रधार आहे, असेही गव्हाणे यांनी यावेळी म्हंटले.

असेच चित्र गोव्यातही दिसायला लागले आहे – शरद पवार

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले ते म्हणाले की, आज एक दिवस असा जात नाही जेव्हा युपीमध्ये भाजपमधील लोक पक्ष सोडून गेले नाहीत. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी विजयराव गव्हाणे यांनी आपला निर्णय जाहीर केला. माझ्या अंतःकरणात १४ जानेवारी हा दिवस कायम राहतो. या दिवशी मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा जो निर्णय घेतला, तो माझ्या स्वाक्षरीने झाला होता, असे पवार यांनी म्हंटले.

Leave a Comment