व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी विजय जैस्वाल यांची निवड

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाची सन 2021- 24 साठी आज सकाळी मॅनोर हॉटेलमध्ये निवडणूक पार पडली. त्यात औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्षपदी विजय जैस्वाल तर महासचिव शिवशंकर स्वामी, कोषाध्यक्ष जयंत देवळानकर यांची निवड करण्यात आली आहे.

72 विविध संघटनांची शिखर संस्था मानल्या जाणाऱ्या संस्थेसाठी या वर्षी चुरस निर्माण झाली होती. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या महासंघाच्या निवडणुकीचे वारे वाहत होते. शेवटी महासंघाच्या परंपरेप्रमाणे ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या मदतीने ही निवडणूक बिनविरोध व एकमताने पार पडली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष म्हणून विजय जयस्वाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर महासचिवपदी शिवशंकर स्वामी, कोषाध्यक्ष म्हणून जयंत देवळाणकर व कार्यकारणी सदस्य यामध्ये उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी, संजय कांकरिया, अजय मंत्री, खर्डे आप्पा, सहसचिव गुलाम हक्कानी, सुनील अजमेरा, जिल्हा संघटक हरीश पवार, कचरू वेलणकर, मिरज पाटणे यांचा समावेश आहे.

यात 31 पदासाठी एकूण 36 कार्यकारणी सदस्यांच्या अर्ज आले होते.‌ त्यातून 31 कार्यकारणी सदस्य निवडण्यात आले व पदाधिकारी साठी 22 अर्ज आले होते. त्यातून 10 उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेऊन 9 पदाधिकारी व 3 जिल्हा संघटक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी ॲड. ज्ञानेश्वर कांबळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. तर ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून मानसिंग पवार, प्रफुल मालानी, आदेशपालसिंग छाबडा, गोपाल भाई पटेल, व जय शहा यांनी महासंघाच्या कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यासाठी परिश्रम घेतले.