साताऱ्याचे सुपुत्र सुभेदार विजय शिंदे लडाखमध्ये शहिद

सातारा | लडाख येथे सैनिकांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्याचा सुपुत्र शहिद झाला आहे. खटाव तालुक्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे असे मृत जवानाचे नांव आहे. सायंकाळी त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच विसापूर गावावर शोककळा पसरली आहे.

लडाख येथे 26 सैनिकांना जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला. अपघातात अनेक जवान जखमी झाले असून लगेचच जवानांना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आले. थॉईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर हा अपघात झाला.

लष्कराचे वाहन सुमारे 50 ते 60 फूट खोलवर श्योक नदीत पडले. या अपघातात 7 जवानांना मृत घोषित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील विजय शिंदे यांचा समावेश आहे.

महिनाभरात जिल्ह्यातील 4 जवान गमावले

सातारा जिल्ह्याने गेल्या महिन्याभरात 4 जवान गमावले. गेल्या आठवड्यात बामणोली तर्फ कुडाळ येथील 22 वर्षीय प्रथमेश पवार गोळी लागून शहिद झाले. दोन जवान मुंबई येथे ड्युटीवर असताना उपचारादरम्यान मृत झाले. काल लडाख येथे अपघातात विजय शिंदे हे सुद्धा लष्कराच्या वाहनातून प्रवास करताना शहिद झाले.