Tuesday, January 7, 2025

धनंजय मुंडेंची विकेट तर भुजबळांचा..; राजकीय वर्तुळात नव्या दाव्याने चर्चांना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. सध्या या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड पोलीस कोठडीत शिक्षा भोगत आहे. मात्र त्याला वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) प्रयत्न करत आहेत, असा आरोप विरोधी पक्ष नेत्यांकडून केला जात आहे. तसेच, या कारणामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

या सर्व घडामोडींमध्येच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी एक मोठा दावा केला आहे. “बीड जिल्ह्यातील घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मौन पाहता मंत्री धनंजय मुंडेंची विकेट काढली जाऊ शकते आणि त्यांच्याऐवजी छगन भुजबळांचा (Chhagan Bhujbal) मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.” असे विजय वडेट्टीवार यांनी म्हणले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

विजय वडेट्टीवार नेमके काय म्हणाले??

या सर्व प्रकरणांमध्ये बोलताना वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मौन पाहता कदाचित मंत्री धनंजय मुंडे यांची विकेट काढली जाऊ शकते. धनंजय मुंडे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता किंवा असा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे का? असा प्रश्न आम्हाला चार ते पाच दिवसांपासून पडलेला आहे. कारण अजित पवार हे बीडच्या प्रकरणात अजिबात बोलत नाहीत.

त्याचबरोबर, “मला काल जी माहिती मिळाली ती अशी आहे की, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो, म्हणून पोलिसांना विनंती आहे की, मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काऊंटर करू नका.” असाही दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.