विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार, पोलिस गाडी पलटी झाल्यानंतर केला होता पळण्याचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कानपूर | उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला ठार करण्यात आलं आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं. विकास दुबेचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

पोलिसांनी रुग्णालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबे याने अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर झालेल्या चकमकीत विकास दुबे जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्याचा मृत्यू झाला. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

कुख्यात गुंड विकास दुबेला गुरुवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे विकास दुबेला अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यापासून पोलीस विकास दुबेचा शोध घेत होते. त्याच्यावर पाच लाखांचं बक्षीसदेखील जाहीर करण्यात आलं होतं. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर विकास दुबे पोलिसांच्या हाती लागला. २ जुलै रोजी उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबेला अटक करण्यासाठी कानपूर येथे गेले असता त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला  होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment