म्हसवड | माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी विलास देशमुख तर उपसभापतिपदी वैशाली विरकर यांची निवड करण्यात आली. सातारा जिल्ह्यात एकमेव झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेत बाजी मारत याठिकाणी भाजप- रासपचा झेंडा फडकाविलेला आहे.
मार्केट कमिटीच्या उपसभापतिपद हे रासपकडे जाणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे मार्केट कमिटीच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या मामूशेठ विरकर यांच्या पत्नी वैशाली विरकर यांना प्रथम संधी देण्याचे सर्वानुमते ठरल्याने त्यांची मार्केट कमिटीच्या उपसभापतिपदी निवड करण्यात आली. सभापती विलास देशमुख हे आमदार गोरे यांचे अत्यंत विश्वासू व कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर आमदार गोरे यांच्यासाठी प्रत्येक निवडणुकीत हिरहिरने व प्रामाणिकपणे काम केल्यानेच त्यांना सभापती पदासाठी संधी गोरे यांनी दिली असल्याचे बोलले जात आहे.
विलास देशमुख यांच्या निवडीने आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मार्डी गट भक्कम केला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नूतन सभापती, उपसभापतींचे सर्व सदस्यांचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार गोरे, भाजपचे तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्यासह रासपचे आप्पासाहेब पुकळे, बबनदादा विरकर, मामुशेठ विरकर, डी. जी. दोरगे आदींनी अभिनंदन केले.