धक्कादायक ! अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या,गावकऱ्यांनी मृतदेहासोबत लावले प्रेयसीचे लग्न

कोलकाता : वृत्तसंस्था – कोलकाता या ठिकाणी एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या नंतर गावकऱ्यांनी वैतागून प्रियकराच्या मृतदेहासोबतच प्रेयसीचं लग्न लावून दिले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. ही घटना पश्चिम बंगालच्या बर्दवान भागामध्ये घडली आहे.

काय आहे प्रकरण
अल्पवयीन मुलगा आणि त्याची प्रेयसी यांचे धर्म वेगवेगळे होते तरीदेखील दोघांचेही नातेवाईक त्यांच्या लग्नासाठी तयार होते. मात्र मुलगा अल्पवयीन असल्यामुळे मुलीची आई या लग्नासाठी तयार नव्हती. या कारणावरून मुलगा आणि मुलगीमध्ये वाद झाला आणि ह्या वादातूनच मुलाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी या मुलाने आपल्या प्रेयसीला मी आत्महत्या करत आहे असे सांगितले आणि त्यानंतर त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर प्रेयसीला आपला फोटो पाठवला आणि आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

यानंतर या मुलाचा मृतदेह गावामध्ये आणण्यात आला. आणि यावरून पुन्हा एकदा वाद सुरु झाला. यानंतर स्थानिकांनी मुलगी आणि तिच्या आईला जबाबदार धरत दोघींना मारहाण करण्यात आली. यानंतर या दोघीना जबरदस्ती मुलाच्या मृतदेहाजवळ आणण्यात आले आणि त्यानंतर मुलाच्या मृतदेहाकडून मुलीच्या भांगात कुंकू भरण्यात आले. मृत मुलाच्या शेजाऱ्याचे असे म्हणणे आहे कि या मुलीला याची कल्पना होती, की मुलगा आत्महत्या करत आहे. या मुलीकडे त्या मुलाच्या आईचा नंबरदेखील होता. तरीदेखील या मुलीने मुलाच्या कुटुंबियांना याची कल्पना दिली नाही. जर या मुलीने याची माहिती दिली असती तर त्याला वाचवता आले असते असे सांगण्यात आले आहे. मुलीच्या आईने मारहाण आणि अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. आरोपींविरोधात लवकरच कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.