गावकऱ्यांनी केली भाजप आमदाराला ‘गावबंदी’ बैलगाड्या आडव्या लावून अडवली गाडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला प्रतिनिधी । निवडणूक प्रचारासाठी गावात येत असलेल्या भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदाराची गाडी गावात येण्यापूर्वीच गावकऱ्यांनी बैलगाड्या आडव्या करून अडवली. तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथे हा प्रकार घडला. अकोट मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि भाजप उमेदवार प्रकाश भारसाकळे यांना वान प्रकल्पाच्या मुद्द्यावरून परिसरातील काही गावांनी गावबंदी केली आहे.

मंगळवारी संध्याकाळी आमदार भारसाकळे आणि त्यांचा ताफा प्रचारासाठी गाडेगावात जात असताना गावकऱ्यांनी रस्त्यावर आडव्या बैलगाड्या लावून आमदार महोदयांना गावात येण्यापासून रोखले. गावकऱ्यांची समजूत काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न आमदारांनी केला. पण ग्रामस्थांनी, तुम्हाला ५ वर्षांत गाव दिसलं नाही का हा संतप्त सवाल विचारत आमदारांना धारेवर धरलं.

गावकरी ऐकत नाहीत हे लक्षात आल्यानंतर आमदारांनी तिथून काढता पाय घेतला. राज्यभरात भाजपविषयी नाराजीचं वातावरण असल्याचं पहायला मिळत आहे. राज्यातील आणि केंद्रातील मोठे नेते प्रचारसभांतून आपली भूमिका छातीठोकपणे मांडत असताना स्थानिक उमेदवारांना मात्र जनतेकडून चांगलंच धारेवर धरण्यात येत आहे. या नाराजीचा उमेदवारांना फटका बसणार का याचं उत्तर येत्या विधानसभा निवडणुकांचे निकालच देतील.

Leave a Comment