हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) अंतिम सामन्यासाठी अपात्र घोषित करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ५० किलोपेक्षा जास्त वजन भरल्याच्या कारणाने तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न अधुरेच राहिले. मात्र तिचे रौप्य पदक सुद्धा तिला गमवावे लागले. या एकूण सर्व घडामोडीनंतर आता विनेश फोगाटला न्याय मिळवून देण्यासाठी भारताने दमदार पावले उचलली आहेत. आता विनेशची लढाई हि कुस्तीच्या मैदानात नाही तर कोर्टात आहे. महत्वाची बाब म्हणजे जगप्रसिद्ध वकील हरीश साळवे हे तिच्याकडून केस लढणार आहेत. हरीश साळवे यांनी विनेश फोगटच्या वतीने क्रीडा लवादाच्या न्यायालयात (सीएएस) हजर राहण्याचे मान्य केले असल्याचे सांगण्यात आले. हे तेच हरीश साळवे (Harish Salve) आहेत ज्यांनी कुलभूषण जाधव यांची केस अवघ्या १ रुपयांत लढून पाकिस्तानला घाम फोडला होता.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) विनेश फोगटच्या अपिलासाठी सीएएससमोर वकील नियुक्त करण्यासाठी अतिरिक्त वेळेची विनंती केली होती. विनेशने दोन प्रकरणांमध्ये अपात्रतेविरुद्ध अपील केले होते. यातील एक म्हणजे तिचे वजन पुन्हा एकदा चेक करणे आणि दुसरं म्हणजे तिने जिंकलेले रौप्यपदक तिला कायम ठेवण्यात यावं, कारण मंगळवारी तिने योग्य वजन करूनच मॅच खेळली होती आणि जिंकली सुद्धा होती. यातील दुसऱ्या प्रकरणावर चर्चा करण्याची तयारी सीएएसने दर्शवली आहे.
CAS मध्ये आज म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता याबाबतची सुनावणी सुरू होईल. हरीश साळवे हे विनेश फोगटची बाजू मांडतील. हरीश साळवे हे देशातील सर्वात हुशार वकील मानले जातात. यापूर्वी हरीश साळवे यांनी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला लढवला होता. लाखो रुपयांची फी घेणारे साळवे यांनी कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी फक्त एक रुपये फी घेतली होती. तसेच ती केस जिंकली सुद्धा होती. त्यामुळे आजही ते दमदार युक्तिवाद करून विनेश फोगटला न्याय देतील अशी अपेक्षा आणि इच्छा देशवासीयांची आहे.