औरंगाबाद | कोरोनाच्या काळात अनेक बड्या नेत्यांवर संचारबंदी आणि जमावबंदी उल्लंघन करण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. काही नेत्याचे वाढदिवस तर काही नेत्याचे विकासकामांचे उदघाटन अशा प्रसंगी संचारबंदीचे आणि जमावबंदीचे उल्लंघन करीत शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी कोरोना नियमावलीची पायमल्ली केली आहे. आता पुन्हा शिवसेनेच्या एका मंत्र्याने अशाच प्रकारे नियमांचे उल्लंघन केल्याची घटना समोर आली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर चर्चेचा विषय बनला आहे.
शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांनी संचारबंदी उल्लंघन करत पैठण तालुक्यातील दादेगाव परिसरात विकास कामांचे उदघाटन केले आहे. उदघाटनच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तुंबळ गर्दी केली होती. संचारबंदी आणि जमावबंदी असताना देखील मंत्री संदिपान भुमरे यांनी गर्दी जमवली, आणि विकास कामाचे उदघाटन केले. त्याच बरोबर उदघाटन झाल्यानंतर त्यांनी गर्दी समोर भाषण देखील केले.
एकीकडे कोरोनाने सर्वत्र कहर केला आहे त्यात सत्ताधारी पक्षाचे बड्या नेत्यांचे हे वागणे कितपत योग्य आहे असा सवालही आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
आमदार,महापौर,आता मंत्री.
नियमांचे पालन करा, गर्दी टाळा, अशा सूचना सरकार कडून वारंवार देण्यात येत आहे.मात्र त्याच सरकार मधील सत्ताधारी पक्षातील नेते मंडळी नियमांची पायमल्ली करीत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी उदघाटन वेळी गर्दी केल्याचा आरोप आहे तर शिवसेनेचे मनपातील माजी महापौर नंदकुमार घेडले यांनी वाढदिवशी गर्दी जमीवल्याची ताजी घटना असताना आता त्याच शिवसेनेचे मंत्री संदीपाण भुमरे यांनी नियमाची पायमल्ली केल्याचे समोर आले आहे.