जमावबंदीचे उल्लंघन : कराडात रस्त्यावर वाढदिवस घालणार्‍या 20 जणांवर गुन्हा

कराड | कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. दरम्यान जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. कराड शहर पोलिसांनी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शशी घोडके, माधव पिसे, शशी करपे, नितीन ढेकळे, विकास भंडारे, विनोद भोसले, प्रदीप माने व अन्य दहा ते बारा लोक यांच्यावर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल गाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत. असे असतानाही दसरा सणाच्या अनुषंगाने शुक्रवारी रात्री पावणेआठच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना कराड नगरपालिका व आंबेडकर पुतळ्याजवळ लादे गल्ली येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांची गर्दी जमल्याचे आढळून आले. तेथे कोणाचातरी वाढदिवस साजरा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.

त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक जाधव, राजगे, देसाई, माने यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी सपोनि अमित बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली गर्दीमध्ये जाऊन पाहिले असता तेथे शशी घोडके, माधव पिसे, शशी करपे, नितीन ढेकळे, विकास भंडारे, विनोद भोसले, प्रदीप माने व त्यांच्यासोबत आणखी दहा ते बारा लोक असे मिळून निशांत ढेकळे यांचा वाढदिवस साजरा करीत होते. यावेळी निशांत ढेकळे हा केक कापत होता. त्या ठिकाणी जमलेल्या गर्दीतील काही लोक विनामास्क होते. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांना जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाच्या अनुषंगाने आपणाकडे कोणत्या विभागाची परवानगी आहे का? असे विचारले असता त्यांनी नाही म्हणून सांगितले. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल होणार : अमित बाबर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे कोणी उल्लंघन करत असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. तसेच या प्रकारामध्ये जे अनोळखी लोक आहेत, त्यांची ओळख पटवून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी घटनास्थळावरील फोटो व इतर गोष्टी पाहिल्या जात असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर दिली.

You might also like