हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) जगभरातील खवय्ये मंडळींसाठी खाण्यातचं स्वर्ग असतो. पण खाण्यामुळे स्वर्ग दिसू शकतो हे नुसतं ऐकूनचं खायची भीती वाटेल का नाही? सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला अशीच भीती वाटू शकते. तसं पाहिलं तर, सोशल मीडियावर कायम विविध पदार्थांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यातील अनेक व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. पण हा व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी सुटायचं सोडाचं अंगाला घाम सुटेल आणि डोक्याला शॉट लागेल.
डॉक्टर सांगतात तळलेल्या पदार्थांपासून लांब रहा, ऑईली फूड खाऊ नका. पण या व्हिडिओत बनवला जाणारा पदार्थ तेलात अक्षरशः पोहतोय. (Viral Video) हा पदार्थ म्हणजे जगभरातील तमाम खवय्यांचा आवडता आलू पराठा आहे. होय आलू पराठा. लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येक जण आवडीने आलू पराठा खातो. पण या व्हिडिओत बनवला जाणारा आलू पराठा खायची हिंमत कुणी क्वचितच करू शकेल.
तेलात पोहणारा आलू पराठा (Viral Video)
पराठ्यांमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. पण त्यातल्या त्यात आलू पराठा अनेक खवय्यांचा प्रचंड लाडका. त्यामुळे अनेक लोक चौपाटीवर किंवा पराठा हाऊसमध्ये गेल्यानंतर आवर्जून आलू पराठा खाणे पसंत करतात. अनेक लोकांच्या घरात नाश्त्यालासुद्धा आलू पराठा बनतो. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील आलू पराठा खाणं खरंच अशक्य आहे. या व्हिडिओमध्ये मळलेली कणिक दिसतेय आणि कणकेच्या गोळ्या उकडलेला बटाटा भरून पराठा तयार केला जातोय. पण हा पराठा बनवताना तेलाच्या प्रमाणाला काही मर्यादाच नसल्याचे दिसत आहे.
मुळात पराठा बनवताना १ चमचा जास्तीत जास्त तर २ चमचे तेल लागतं. पण या माणसाने हा पराठा तेलामध्ये तळून काढलाय, असं म्हटलं तर चुकीचं वाटायला नको. आता एवढं तेल घातल्यानंतर भाऊ थांबेल वाटलं. पण तो काही थांबायचं नावच घेईना. पराठा फुलताक्षणी त्याने शक्य तितकं बटर कोंबल्याने तो आलू पराठा आता गळायला लागला आहे. हा एवढा तेलकट आलू पराठा असेल तर त्याला हेल्दी कसं म्हणायचं? असा मोठा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडलाय.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ इंस्टाग्राम हॅण्डलवर foodie_aman13 या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत जवळपास २८ लाखांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे. यातील अनेकांनी या व्हिडिओवर सडकून टीका केली तर काही लोकांनी हा व्हिडिओ बनवणाऱ्याला चांगलंच सुनावलं आहे. (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या आलू पराठ्याचा व्हिडिओ पाहून काहींनी ‘एका मिनिटात स्वर्गानुभूती होईल’, असे म्हटले आहे.
मौत का पराठा
तसं तर असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मात्र, काही व्हिडिओंमध्ये अतिशयोक्ती असते आणि त्यापैकी हा एक व्हिडिओ आहे. (Viral Video) हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील एका नेटकाऱ्याने म्हटलंय, ‘याला पराठा म्हणायचं? आलू पराठा म्हणायचं? की मौत का पराठा म्हणायचं? तसेच आणखी एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘या पराठ्याचा पहिला घास घेतल्यानंतर स्वर्गानुभूती आणि दुसरा घास घेतल्यानंतर डायरेक्ट स्वर्गच दिसेल’. अशाप्रकारे अनेक नेटकऱ्यांनी या हार्ट अटॅक पराठ्याला आणि पराठा बनवणाऱ्याला कमेंट्सच्या माध्यमातून चांगलेच झोडपून काढले आहे.