Friday, June 9, 2023

विराट कोहलीला ICCकडून आणखी एक धक्का; पहिल्या कसोटीतील ‘भोपळा’ पडला महागात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला होता. त्याचा फटका त्याला आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत बसला आहे. याच कसोटीत जसप्रीत बुमराहनं दमदार कामगिरी करून दाखवली त्यामुळे तो गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये आला आहे.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट यांनं पहिली कसोटी गाजवली अन् त्याला त्याचा फायदा झाला, तर जेम्स अँडरसननेही आगेकूच केली आहे. आयसीसीनं गुरुवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत गोलंदाजांमध्ये भारताचा आर अश्विन यानं ८५६ गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर जसप्रीत बुमराहनं ७६० गुणांसह ९व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तो पुन्हा टॉप टेनमध्ये स्थान मिळवण्यासाठी यशस्वी झाला आहे.

जेम्स अँडरसन ७९५ गुणांसह सातव्या, तर स्टुअर्ट ब्रॉड ७७२ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. फलंदाजांमध्ये विराट कोहलीला २१ गुणांचा फटका बसून त्याची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. रोहित शर्मा व रिषभ पंत यांनी आपले अनुक्रमे सहावे व सातवे स्थान कायम राखले आहे.