कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील ओंड येथील मूळच्या रहिवाशी व गुणवरे (ता. फलटण) येथील सौ. विशाखा आढाव-भोने यांची मंत्रालयात जलसंपदा विभागात अवर सचिवपदावर पदोन्नती झाली आहे. आकाराम व शालन भोने या शिक्षक दांम्पत्यांची त्या कन्या असून त्याच्या निवडीबद्दल विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.
विशाखा आढाव-भोने यांची सन 2009 च्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सरळसेवेतून कक्ष अधिकारी या पदावर मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती झाली होती. त्यांनी ग्रामविकास व जलसंधारण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग येथे यशस्वीरित्या सेवा केली आहे. आता त्यांची जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई या विभागात अवर सचिव पदावर पदोन्नती झाली आहे. विशेष प्राविण्यासह एम.ए.बी.एड, पुणे विद्यापीठाची सेट इत्यादी पदव्या प्राप्त केल्या आहेत.
शासकीय सेवेत कार्यरत असतानाच स्पर्धा परिक्षेचे विनामुल्य मार्गदर्शन, आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठान, मुंबई संस्थेबरोबर फलटण तालुक्यातील बचत गटातील महिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजन बरोबरच ओंड येथील ज्ञानदीप संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना मार्गदर्शन करणे अशा विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचे योगदान सुरु आहे. विशाखा आढाव-भोने यांचे अवर सचिव पदावरील पदोन्नतीबद्दल त्यांचे विविध मान्यवरांसह जलसंपदा विभाग, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी, ज्ञानदीप सामाजिक संस्थेसह ओंड व गुणवरे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.