हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विशाल मशाल विझवणार…सांगलीतल्या या प्रचाराची लाईन तंतोतंत खरी करून दाखवत विशाल पाटलांनी मोठ्या मताधिक्याने अपक्ष खासदार होण्याचा मान मिळवलाय… महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही पाटलांच्या तोंडच पाणी पळवत अपक्ष म्हणून निवडून येणं याला पक्की जिगर लागते.. पण या सगळ्यात सर्वात जास्त पाचर कुणाची बसली असेल तर ती काँग्रेसची… विशाल पाटलांचे (Vishal Patil) निवडून येण्याचे फुल चान्सेस असतानाही त्यांना डावलण्याच्या कार्यक्रमात काँग्रेसचा मोठा हात होता…पण असं असतानाही विशाल पाटील शेवटपर्यंत म्हणत राहिले.. मी हाडाचा काँग्रेसी आहे…पक्षासोबत असणारी मी निष्ठा कधीच सोडणार नाही… पण या सगळ्या गेममध्ये महत्त्वाची होती ती प्रतिष्ठा… त्यामुळे निष्ठेला धक्का न लावता प्रतिष्ठा कशी मिळवायची? हे कुणाकडून शिकावं तर ते विशाल पाटलांकडून… विशाल पाटील यांनी दोन पाटलांना दिलेल्या धोबीपछाडाचा हा आढावा…
सांगलीतील (Sangli Lok Sabha Election) तीन पाटलांच्या मतदानाची कुस्ती पार पडली…पण अपेक्षेप्रमाणे बाजी मारली ती विशाल पाटलांनी…मतदारांचा विशाल जनसमुदाय त्यांच्या पाठीशी आला आणि दादा पाटील घराण्याची त्यांनी आब राखली… विशाल पाटलांचं तिकीट कापल्यानं सांगलीची जागा चर्चेत आली होती. नो मशाल ओन्ली विशालच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या… आणि आता विशाल खासदार होऊन त्यांनी समर्थकांचा शब्द खरा करून दाखवला.. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सांगलीची जागा प्रतिष्ठेची बनेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. दोन टर्म भाजपच्या संजय काका पाटलांनी दिल्ली वारी केल्यावर काँग्रेसचा हा बालेकिल्ला विशाल पाटलांना खासदार बनवण्यासाठी मनानं आणि मतानं तयार होता. पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मिठाचा खडा पडला. आणि सांगलीचा तिढा वाढला. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा फॉर्मुला समोर येत उद्धव ठाकरेंनी तिकीट वाटपाच्या आधीच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगलीतून उमेदवारी जाहीर केली. यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी विश्वजीत कदमांच्या मदतीने तिकिटासाठी ताकद लावली. पण त्याला यश काही आलं नाही. अखेर विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून फॉर्म भरला. निवडणूक चिन्ह मिळालं लिफाफा…
मतदानाच्या दिवशी लढत तीन पाटलांच्यात होती. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील. पण सांगलीत खरी लढत दोघांच्यातच झाली एक म्हणजे विद्यमान भाजप खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील… ठाकरे गटाची जिल्ह्यातील असणारी कमकुवत ताकद, विश्वजीत कदमांचा मदतीचा छुपा हात आणि विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची भावना हे सगळे फॅक्टर निर्णायक ठरले आणि चंद्रहार पाटील निवडणुकीआधीच साईडलाईन झाले. त्यामुळे कमळ विरुद्ध लिफाफा असंच वातावरण निकालाच्या दिवशीही पाहायला मिळालं. पण अखेर कमळाला लिफाफा जड गेला…
अर्थात या विजयात खारीचा वाटा द्यावा लागेल तो विश्वजीत कदमांना… विशाल पाटलांसाठी जीवाचं रान करत प्रसंगी आपल्या पक्षातील हायकमांडला अंगावर घेण्याची धमक कदमांनी दाखवली… काँग्रेसची प्रचार यंत्रणा अदृश्यपणे विशाल पाटलांच्या मागे लावली.. दादा पाटील घराण्याच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही विशाल पाटलांसाठी जीव तोडून प्रचार केला होता. भरीस भर म्हणजे वंचितनंही विशाल पाटलांना पाठिंबा देऊन मोठा डाव साधला. सुजात आंबेडकरांपासून वंचितची टीम संपूर्ण प्रचारात विशाल पाटलांच्या पाठीशी होती. त्याचंच प्रतिबिंब आता निकालातही गोष्ट दिसतंय… विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरही नजर टाकली तर हे स्पष्ट होतं की विशाल पाटलांचं पारडं जड झालंय. पलूस कडेगाव आणि मिरजेमधून विशाल पाटलांना मिळणारं लीड तासगाव मधून संजय काका पाटलांना तोडताना दमछाक झालेली दिसते. त्यामुळे एकट्या हिंदुत्वाच्या मतांच्या आधारावर संजय काका पाटील सांगलीची खिंड लढवताना दिसले. पण विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची लाट ही सांगलीत निर्णायक ठरलीच..
थोडक्यात सांगायचं झालं तर विशाल पाटलांना हलक्यात घेणं महाविकास आघाडीला जड गेलं.. सांगलीच्या जागेचा हट्ट करून आपला निर्णय चुकला, याचा ठाकरे गटाला नक्कीच पश्चाताप होईल. भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी विद्यमान खासदाराला शह देत, शिवसेनेची मशाल विझवत विशाल पाटील हे सांगलीत गेम चेंजर ठरले… हे सगळं घडत असताना आपल्या काँग्रेसी असण्याचा आणि पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा हवाला देत, काँग्रेस वरिष्ठांचीही गोची केली. थोडक्यात निष्ठेसोबत प्रतिष्ठा कशी जपायची हे विशाल पाटलांकडून शिकावं, एवढं मात्र नक्की…