सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवणारा कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील आणि अंतिम फेरीत तुल्यबळ लढत दिलेला उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांना अनुक्रमे 5, 55, 555 व 2, 22, 222 रुपयांचे रोख इमान देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कोरेगाव येथे शनिवार, दि. 16 रोजी हे इनाम दोन्ही मल्लांना एकत्रित 7,77,777 रूपयांचे बक्षीस वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती आ. महेश शिंदे यांनी दिली.
कुस्तीमध्ये सातारा जिल्ह्याचे वेगळे स्थान आहे. जिल्ह्यात कुस्तीची परंपरा वाढीस लागावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ना. एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व मी स्वत: प्रयत्न करत आहे. सातारा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होण्यासाठी ना. एकनाथ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब पटकवणारा पृथ्वीराज पाटीलचा गौरव करण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्याचबरोबर उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर याचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण घेत असताना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कुस्तीची गोडी लागावी म्हणून प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर व हिंद केसरींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी विशेष शिबिरे घेण्याचा ना. एकनाथ शिंदे यांचा मनोदय आहे. कुस्तीचा प्रसार करण्याच्या हेतूने संपूर्ण जिल्ह्यात तालमी उभारल्या जाणार आहेत. खराब झालेल्या तालमींचे पुनरुज्जीवन केले जात आहे, असे आ. शिंदे यांनी सांगितले.