सोलपूर प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी रोज हजारो भाविक येत असतात. ही बाब लक्षात घेता विठ्ठल आणि रुक्मिणीच्या ऑनलाईन दर्शनाची सुविधा भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र आता विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या ‘ऑनलाइन दर्शन’ सेवेसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. आजवर मोफत असलेली ही सेवा आता सशुल्क करण्यास मंदिर समितीच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. लवकरच याचा निर्णय जाहीर केला जाणार आहे.मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत.
दरम्यान सध्या ‘ऑनलाइन दर्शना’साठी कुठलेच शुल्क आकारले जात नाही. परंतु ऑनलाइन दर्शन सेवा घेतलेल्या भाविकांना दर्शन रांगेतील भाविकांना थांबवून अनेकदा सोडले जाते. हे प्राधान्य देण्यासाठी आता ऑनलाइन दर्शनासाठी शुल्क आकारण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. याबाबत समितीच्या सह अध्यक्षांनी हा निर्णय झाला असला तरी त्याचा आदेश राखून ठेवला आहे. जर हा निर्णय झाला तर समितीच्या उत्पन्नात वाढ होईल असे मत विठ्ठल जोशी यांनी व्यक्त केले.