Wednesday, October 5, 2022

Buy now

वाई येथे वकिलाच्या पत्नीची हातचलाखीने सहा तोळ्याची फसवणूक

वाई | पोलिस असल्याचे भासवून अज्ञात चोरट्यांनी वाई येथील एका वकीलाच्या पत्नीची हातचलाखीने फसवणूक केल्याची घटना घडली. दरम्यान, अज्ञातांनी सहा तोळे सोने लंपास केले असून याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत वाई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सकाळी शुभांगी प्रमोद थिटे या त्यांच्या गणपती आळीतील स्टेशनरीच्या दुकानात निघाल्या होत्या. कन्याशाळा रोडवर दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी त्यांना अडवले. दरम्यान, त्यांना ‘तुम्ही गळ्यात एवढे सोने घालून फिरू नका, या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, आम्ही साध्या वेशातील पोलीस आहोत, तरी गळ्यातील मंगळसूत्र व हातातील बांगड्या काढून द्या, आम्ही कागदात गुंडाळून सुरक्षित तुमच्या पिशवीत ठेवून देतो,’ अशी बतावणी केली. यावेळी शुभांगी थिटे यांनी अज्ञातांच्या हातात अंगावरील दागिने काढून दिले. अज्ञातांनी हातचलाखीने खोटे दागिने थिटे यांच्या पिशवीत ठेवले व ते निघून गेले.

दरम्यान, थिटे या दुकानात पोहचल्यानंतर त्यांनी पती प्रमोद थिटे यांना पिशवीतील दागिने दाखवण्यासाठी बाहेर काढले. तेव्हा त्यांना त्यांचे दागिने तेथे मिळून आले नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर शुभांगी थिटे यांनी वाई पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास वाई पोलिस करत आहेत.