वाई हत्याकांड धक्कादायक जबाब : उलटतपासणीत संतोष पोळ म्हणतो, मी नव्हे माफीच्या साक्षीदारानेच खून केला

सातारा | वाई तालुक्यातील धोम येथे 2016 मध्ये सहा खुनाचे आरोप असलेला कथित डॉक्टर संतोष पोळ याने उलटतपासणीत बुधवारी धक्कादायक कबुली दिली. उलटतपासणीत अंगणवाडी सेविका मंगल जेधे हिचा खून ज्योती मांढरे हिने केला आहे. मला फसविण्यासाठी पोलिसांनी मंगल जेधे हिचा मृतदेह पोल्ट्रीमध्ये पुरला असल्याचे संतोष पोळने सांगितले .

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम येथे हत्याकांड समोर आल्याने खळबळ उडाली होती. एकापाठोपाठ सहा खून उघडकीस आले होते, या खटल्यात संतोष पोळची एकेकाळची सहकारी असलेली ज्योती मांढरे ही या खटल्यात माफीची साक्षीदार बनलेली आहे. दरम्यान, जिल्हा न्यायालयात बुधवारी दुपारी कथित डॉक्टर संतोष पोळ, ज्योती मांढरे यांना सुनावणीसाठी आणण्यात आले. सध्या संतोष पोळचा उलट तपास सुरू आहे.

या उलट तपासामध्ये पोळ म्हणाला, मंगल जेधे हिचा खून ज्योती मांढरेनेच केला आहे. पोलीस मला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यातूनच पोलिसांच्या मदतीने जेधे यांचा मृतदेह आणून त्याच्या पोल्ट्रीफार्ममध्ये पुरल्याचा आरोप त्याने केला. न्यायाधीशांनी सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर या खटल्याची पुढील सुनावणी 6 डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले.