वाई पोलिसाची कारवाई : शहरात चोरी करणाऱ्या 4 मुलांना अटक, मुद्देमाल जप्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई शहरातील जोशी विद्यालयतील चोरी आणि बांधकाम व्यावसायिकांचे साहित्य चोरणाऱ्या चार मुलांना वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदारांच्या माहीतीवरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 जानेवारी रोजी त. ल. जोशी विद्यालय, वाईचे उपमुख्याध्यापक दादा भानुदास बनसोडे (रा. रामनगर ता. जि. सातारा) यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यामध्ये म्हटले होते की, दि. 1 जानेवारी रोजी 11.30 ते दिनांक 3 जानेवारी 2022 रोजीचे सकाळी 10.30 वाजण्याच्या दरम्यान शाळेतील संगणक विभागाचे खोलीच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरटयाने शाळेतील मॉनिटर, अँप्लीफायर, माईक स्टण्डसह, केबल व फॅन असे एकुण 26 हजार रुपयांचे साहीत्य चोरीस गेलेले आहे.

वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पथक वाई शहर व पोलीस स्टेशन हद्दीतील गावामध्ये पेट्रोलिंग करुन व बातमीदारामार्फत अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत होते. सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर वाई पो.स्टेशनचे पोलीस निरीक्षक  बाळासाहेब भरणे यांना त्यांच्या खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, गुरेबाजार झोपडपट्टी,सिध्दनाथवाडी, वाई येथे राहणारी 3 मुले व 1 विधी संघर्ष बालकाने वाई शहरात बरेच चोऱ्या केलेल्या आहेत. त्यानंतर बाळासाहेब भरणे यांनी सदरची माहीती गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचाऱ्यांना देवून आरोपींना तात्काळ पकडणे बाबत सुचना दिल्या. त्यानूसार तीन आरोपी व एक विधी संघर्ष बालक यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचाऱ्यांनी वाई शहरात फिरत असताना ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस केली. तेव्हा त्यांनी त. ल. जोशी विद्यालय वाई येथील चोरी केली असल्याचे कबूल केले.

त्याशिवाय गंगापूरी व मच्छि मार्केट वाई येथील नविन बांधकामाच्या ठिकाणच्या 20 सेंन्ट्रींग प्लेटा, पुलाच्या नविन बांधकामाच्या ठिकाणची केबल चोरली असल्याचे कबूल केले. या गुन्ह्यात चोरलेला सुमारे 80 हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, वाईच्या उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शितल जान्हवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाई बाळासाहेब भरणे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, महीला पोलीस नाईक सोनाली माने, पो. कॉ. अमित गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड यांनी केलेली आहे.