हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) यांना बीडच्या जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने हि बातमी दिली आहे. मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत. तसेच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपीही त्याच तुरूंगात आहेत. याच दरम्यान, किरकोळ कारणावरून अन्य कैद्यांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण केल्याची माहिती येतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांकडून कारागृहात कराड आणि घुले यांना मारहाण झाली. अक्षय आठवले नावाचा आरोपी मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत आहे. तर महादेव गीते हा परळीतील आणखी एक आरोपी आहे. ते दोघे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर येत आहे. सुरूवातील त्यांची बाचाबाची झाली , नंतर त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाली अशी माहिती समोर येतेय. खोट्या आरोपाखाली वाल्मिक कराडने अडकवल्याची गीते गँगचा आरोप आहे. त्यातूनच गीते गँगकडून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर हल्ला करण्यात आला असावा. परंतु जेल प्रशासनाने अद्याप या मारहाणीच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. तुरुंग प्रशासनाने या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. कारागृहातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडेकोट करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. यापूर्वीही तुरुंगात अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भाजप आमदार आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणाऱ्या सुरेश धस यांनी या एकूण प्रकरणावर प्रतिक्रिया देत म्हंटल कि, महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराडने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा राग असू शकतो, लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार कराडने केलेले आहेत. त्यामुळे त्यांना झापडझुपड झाली असेल. जेलमध्ये मारहाण होत असेल तर जेल सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना अमरावती आणि नागपूरच्या जेलमध्ये हलवावे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे