Buy Land on Moon : पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असलेल्या चंद्राविषयी जाणून घेण्याची सर्वांना इच्छा आहे. नुकतेच चांद्रयान 3 ने चंद्रावर जाऊन तेथील अनेक महत्वाच्या घटकांची माहिती मिळवली आहे. ही चंद्रावरील विविध गोष्टींचे संशोधन सुरु आहे.
असे असताना तुम्ही नक्कीच ऐकले असेल की अनेक भारतीय लोक चंद्रावर जमीन खरेदी करत आहेत. याबाबत पृथ्वीवरील काही कंपन्या चंद्रावरील जमीन विकण्याचा दावा कसा करतात हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तसेच काही श्रीमंतांनी चंद्रावर जमीन खरेदी केल्याच्या बातम्या देखील आल्या आहेत. त्यापैकी काही लोक उद्योगपती तर काही चित्रपट स्टार आहेत.
तसेच चंद्रावर प्लॉट रजिस्ट्री झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत. समुद्र आणि बेटांप्रमाणे अवकाश कोणत्याही देशाच्या ताब्यात येत नाही. अशा स्थितीत प्रश्न पडतो की मग चंद्रावरील जमीन कोण आणि कशी विकत आहे? जाणून घ्या याबद्दल सविस्तर
चंद्रावरील जमीन कोण विकत आहे?
लुना सोसायटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लूनर लँड्स रजिस्ट्री या दोन्ही कंपन्या आहेत ज्या चंद्रावर जमीन विकण्याचा दावा करतात. Lunarregistry.com या साईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, चंद्रावरील वेगवेगळ्या भागात उपलब्ध जमिनीची किंमत वेगळी आहे. जर तुम्हाला शांततेच्या समुद्रात चंद्रावर जमीन खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 63.07 डॉलर प्रति एकर म्हणजेच 5261 रुपये मोजावे लागतील.
या लोकांनी चंद्रावर जमिनी विकत घेतल्या
चंद्रावर जमीन खरेदीची प्रक्रिया आजपासून नाही तर काही वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. 2002 मध्ये हैदराबादचे राजीव बागरी आणि 2006 मध्ये बेंगळुरूचे ललित मोहता यांनी या एजन्सींमार्फत चंद्रावर भूखंड खरेदी केला होता. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतनेही चंद्रावर जमिनीचा एक छोटा तुकडा खरेदी केला होता.
तसेच चांद्रयान-3 च्या यशानंतर जम्मू-काश्मीरचे व्यापारी रुपेश मेसन यांनीही चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. मेसनच्या म्हणण्यानुसार, त्याने चंद्रावरील ही मालमत्ता न्यूयॉर्कमधील ‘द लूनर रजिस्ट्री’ कडून खरेदी केली होती आणि 25 ऑगस्ट रोजी अधिकृतपणे प्रमाणित करण्यात आली होती. चंद्रावर भूखंड खरेदी करणारे लोक असा विश्वास करतात की आज नाही तर उद्या चंद्रावर जीवन निश्चितपणे स्थिर होईल.
चंद्रावरील भूखंड विकणे कायदेशीर आहे का?
1967 च्या बाह्य अवकाश करारानुसार चंद्रावर कोणत्याही एका देशाची मक्तेदारी नाही आणि सुमारे 110 देशांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. पृथ्वीच्या पलीकडे असलेल्या विश्वावर संपूर्ण मानवजातीचा हक्क आहे. यासाठी कोणत्याही ग्रह किंवा उपग्रहावरील जमिनीचे मालकी हक्क कोणालाही देता येणार नाहीत. मात्र, या एजन्सी वर्षानुवर्षे चंद्रावरील जमिनी विकत आहेत.