Wardha-Nanded Railway line : भारतात रेल्वेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. अगदी चारच दिवसांपूर्वी काश्मीर मध्ये सुद्धा ट्रेन सुरु झाली. तर सिक्कीम सारख्या डोंगराळ भागात जिथे अद्याप ट्रेन पोहचली नव्हती तेथे देखील ट्रेन धावणार आहे. एवढेच नाही नाही तर देशभरातील विविध रेल्वे स्थानकांचा विस्तार देखील करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास वर्धा – यवतमाळ – नांदेड या विदर्भाला मराठवाड्याशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. एवढेच नाही तर 28 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत या पहिल्या टप्प्यातील कामाचे ई लोकार्पण होणार आहे.
या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील म्हणजेच वर्धा ते यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या ठिकाणापर्यंत 42 किलो मीटरचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वेगाडीची ट्रायल देखील घेण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वर्धा – यवतमाळ – नांदेड या रेल्वे मार्गाला सण 2009 मध्येच मंजुरी मिळाली होती मात्र जमीन अधिग्रहणाच्या कामाला विलंब झाल्यामुळे 2015 साली काम सुरु झाले आणि 2016 साली या मार्गाच्या कामाला गती मिळाली.
कोणत्या स्थानकांचा समावेश ?
पहिल्या टप्प्यात वर्धा ते कळंब पर्यंत काम पूर्ण झाले आहे. या मार्गात देवळी, भिडी, कळंब ही रेल्वे स्थानक बांधण्यात आली आहेत. या मार्गाचे सर्वात महत्वाचे वैशिष्टय म्हणजे या मार्गामुळे वर्धा ते नांदेड हे आंतर केवळ साडेचार तासांमध्ये पार करता येणार आहे. सध्या वर्ध्याहून नांदेडला बसने पोहचण्यासाठी दहा तास लागतात. दरम्यान हा मार्ग पूर्ण झाल्यावर येथील व्यवसाय वृद्धीला हातभार लागणार आहे. पर्यायाने या भागातील विकास होण्यास मदत होणार आहे. शिवाय वर्ध्यापासून तर नांदेडपर्यंत वर्धा, देवळी, भिडी, कळंब, यवतमाळ, लसीना, तापोना, पुसद, अर्धापुर आणि नांदेड अशी स्थानके असणार आहे.
कापूस उत्पादकांना फायदा
या मार्गाचा मोठा फायदा हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. कारण वर्धा यवतमाळ आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्याप्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. येथे मोठ्या बाजरपेठ आणि कापूस उद्योगही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील कामाचे ई लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. वर्ध्यात या रेल्वे मार्गाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.