कोरेगाव |‘महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जिहे-कठापूर योजना मार्गी लागली. लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव योजनेला देण्यापलीकडे भाजपने काही केले नाही. ज्यांना योजनाच माहिती नाही, कसला अभ्यास नाही, ते श्रेय घ्यायला निघाले आहेत. महाविकास आघाडीचा धर्म पाळत मी शांत राहिलो, मात्र आता शांत बसणार नाही,’ असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कोरेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे म्हणाले, ‘जिहे-कठापूर योजनेचे काम 1997-98 पासून सुरु झाले. योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणारे तेव्हा कोठे होते. त्यांना योजना नेमकी काय हे माहीत आहे का?, मुळात त्यांचा अभ्यासच नाही, दोन वर्षांपूर्वी केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असताना भाजपचे गुणगाण गाणाऱ्यांनी केंद्र सरकारकडून नेमका किती निधी आणला, हे कागदोपत्री सिद्ध करावे.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना भाजपचे गुणगान गाणाऱ्यांनी आणि शिवसेनेत असल्याने महाविकास आघाडीचे आहोत, असे दाखविणाऱ्यांनी केंद्र सरकारकडून किती निधी आणला, हे कागदोपत्री सिद्ध करून दाखवावे. स्वत:ला शिवसेनेचे आमदार म्हणवता, तर योजनेला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन दाखवा, असे आव्हान आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले.
‘वास्तविक जिहे-कठापूर योजनेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह प्रमुख मंत्रिगण आणि नेतेमंडळींच्या उपस्थितीत करण्याचे ठरले होते. हे माहीत असताना श्रेय मिळाले पाहिजे, या संकुचितपणातून काहीजणांनी मंगळवारी सकाळीच जलपूजन कार्यक्रम उरकून घेतला. महाविकास आघाडीचा प्रमुख घटक या नात्याने आघाडी धर्म म्हणून मी दोन वर्षे शांत राहिलो. आता जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यामुळे राष्ट्रवादीवर टिका करण्यापूर्वी या योजनेचा संपूर्ण अभ्यास करुन घ्यावा. अन्यथा जशाच तसे उत्तर दिले जाईल,’ असेही शशिकांत शिंदे म्हणाले.